शेतकऱ्यांचा पुन्हा उद्रेक 

शेतकऱ्यांचा पुन्हा उद्रेक 

कल्याण - नेवाळी विमानतळासाठी घेतलेली जमीन परत मिळावी, या मागणीसाठी कल्याणजवळील नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी नेवाळी नाका, कल्याण- मलंगगड रस्त्यावर हिंसक आंदोलन केले. सकाळी साडेआठच्या सुमारास सुरू झालेले हे आंदोलन दुपारपर्यंत धुमसत होते. आंदोलनादरम्यान पोलिसांच्या तसेच खासगी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार, तसेच पॅलेट गनचा वापर करावा लागला. या आंदोलनात 12 पोलिस, तसेच 12 आंदोलक जखमी झाले. त्यापैकी एका आंदोलक शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नेवाळी गावाजवळ नौदलाची 1600 एकर जमीन आहे. या जागेवर संरक्षण दलातर्फे संरक्षक भिंत उभारण्याचे, तसेच भूसंपादनाचे काम सुरू आहे. या कामाला ग्रामस्थांचा विरोध आहे. विरोधाची धार तीव्र करण्यासाठी गुरुवारी "रास्ता रोको' करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. त्यानुसार सकाळी आठ वाजल्यापासून आंदोलनकर्त्यांनी कल्याण- मलंगगड रस्ता रोखून धरला होता. 

आंदोलनादरम्यान महामार्गावरील दोन ट्रक, काही मोटारसायकली पेटवण्यात आल्या. दहा ट्रकच्या टायरची हवाही सोडण्यात आली. 

घटनास्थळी असलेले अंबरनाथचे सहायक पोलिस आयुक्त सुनील पाटील यांच्या पथकाने जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. पोलिसांनी पॅलेट गनचाही वापर केला. त्या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला चढवला. त्यात पाटील तसेच दोन उपनिरीक्षकांसह 12 पोलिस जखमी झाले. आंदोलनादरम्यान जमावाने पोलिसांच्या चार- पाच गाड्याही पेटवल्या. पोलिसांच्या लाठीमारात दोन विद्यार्थ्यांसह 12 जण जखमी झाले. जखमींपैकी जनार्दन म्हात्रे या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. 

पत्रकारांवरही हल्ला 
या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवरही आंदोलकांनी हल्ला केला. त्यात सी. व्ही. निर्मल आणि सुनील जाधव हे पत्रकार जखमी झाले. निर्मल यांच्या हाताला फ्रॅक्‍चर झाले आहे. त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नौदलाचे भूसंपादन बेकायदा 
ही जमीन 70 वर्षांपासून लष्कराच्या ताब्यात असली, तरी आम्ही अनेक वर्षांपासून तेथे शेती करत आहोत. आताही आम्ही या जमिनीत पेरणी केली आहे. अशा परिस्थितीत नौदलाने भूसंपादनाचे काम सुरू करणे हे अन्यायकारक आहे. जमिनीचा वाद अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे, त्यावर निकाल येण्यापूर्वीच भूसंपादनाच्या कामाला सुरवात होणे बेकायदा असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. 

आम्ही अनेक वर्षांपासून शांततेत आंदोलन करत होतो; मात्र सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. उलट जबरदस्तीने आमच्या जमिनी ताब्यात घेण्यास सुरवात केली. तेथे शेती करण्यास आम्हाला मज्जाव करण्यात आला असल्याने आक्रमक भूमिका घ्यावी लागली, असा दावा आंदोलकांनी केला. 

आंदोलनादरम्यान हिंसक कृती करणाऱ्यांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात येतील. 
- परमबीरसिंग, ठाण्याचे पोलिस आयुक्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com