मुंबईच्या डबेवाल्यांची ‘रोटी’ भागवतेय गरिबांची भूक

सुनीता महामुणकर
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

‘शेअर माय डबा’ उपक्रमासाठी संपर्क
 मुंबई शहर ः सुभाष तळेकर  ९८६७२२१३१० / कैलास शिंदे - ८४२४९९६८०३
 मुंबई पूर्व उपनगर ः ज्ञानेश्‍वर कणसे - ८४२४०८६९३५ / पवन अग्रवाल - ९८२१७४३१०६
 मुंबई पश्‍चिम उपनगर ः दशरथ केदारी - ८६५२७६०५४२ / विठ्ठल सावंत - ९८२१९५९४९७

मुंबई -  डबा संस्कृतीचे महत्त्व जगभर पसरविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी सुरू केलेल्या ‘शेअर माय डबा’ चळवळीतून अन्नदानाचे लक्षणीय काम केले जात आहे. पार्टी-लग्नाच्या कार्यक्रमांमधून उरलेले अन्न फेकून देण्याऐवजी ते गरजू-गरिबांना वाटून रोटी बॅंकेचा अनोखा संदेश डबेवाले समाजाला देत आहेत. दोन वर्षांपासून सुरू झालेला ‘रोटी’ उपक्रमाने आज चांगलाच वेग घेतला असून अनेक उपाशीपोटी जीवांना त्यामुळे दिलासा मिळत आहे.

गरिबाची भूक आणि श्रीमंतांच्या घरच्या वाया जाणाऱ्या अन्नात काहीतरी मध्यममार्ग काढण्याच्या हेतूने ‘शेअर माय डबा’ची संकल्पना अस्तित्वात आली. दर वर्षी आपण कोट्यवधी रुपयांचे खाण्यायोग्य अन्न वाया घालवितो किंवा फेकून देतो. लग्न समारंभ, पार्ट्या, हॉटेल, मॉल, कॅन्टीन आदी अनेक ठिकाणी जादा अन्न अक्षरशः फेकून दिले जाते. असे अन्न वाया जाऊ देण्यापेक्षा ते गरजू व्यक्तींच्या पोटात जाण्याच्या उद्देशाने मुंबईतील डबेवाल्यांनी ‘रोटी बॅंक इंडिया’ मोहीम सुरू केली, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी मोहीम सुरू केली तेव्हापासून आम्ही वेगवेगळ्या विभागांतील डबेवाल्यांनी स्थानिक कॅटरर्स, हॉलवाले आणि अशा काही ठिकाणांशी संपर्क साधला व त्यांना रोटी बॅंकची संकल्पना सांगितली. त्यांच्याकडून आम्हाला उरलेल्या जेवणाचे पॅकेटस्‌ मिळायचे. जे आम्ही आमच्या सायकलला लावून गरीब वा बेघर मुलांना वाटायचो. अर्थात, हे करताना डबे पोहोचविण्याच्या आमच्या कामात आम्ही खंड केला नाही. आमचे काम सांभाळूनच आम्ही ही मोहीम राबवितो. आता अनेक कॅटरर्स-हॉलवाले-धार्मिक विधी करणारे अनेकजण स्वतःहून आमच्याशी संपर्क साधतात आणि उरणारे अन्न गरीबांसाठी देतात, असेही ते म्हणाले. 

लोअर परळ, भायखळा, अंधेरी, ग्रॅन्ट रोड, मुलुंड, मालाड आदी विविध भागांमध्ये रोटी बॅंकेचे काम सध्या सुरू आहे. ‘शेअर माय डबा’चा व्याप वाढत असून, संघटनेला महाविद्यालय-कार्यालयांच्या कॅन्टीनमधूनही अन्न नेण्यासाठी बोलाविण्यात येते; मात्र आम्हाला सगळीकडे जाता येत नाही. 

आमच्या मर्यादित मनुष्यबळामुळे शक्‍य आहे तेवढेच काम चोख करण्याचा आमचा प्रयत्न असतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अन्नवाटपाचे काम जगन्नाथाच्या रथासारखे आहे. जेवढे करू तेवढे कमी. आम्ही त्यात खारीचा वाटा उचलत असलो तरी लोकांनी स्वतःहून असे अन्नदान गरजूंपर्यंत केले तर अनेकांची भूक भागू शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी मांडली. 

Web Title: mumbai news mumbai dabbawala Share My Dabba i