राणेंचा मंत्रिमंडळात समावेश शक्‍य?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भाजपप्रवेशाची औपचारिकता बाकी आहे. भाजपमध्ये प्रवेश झाल्यावर त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्‍यता भाजपमधील सूत्रांकडून वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राणे हे राज्यात नको होते. मात्र भाजप श्रेष्ठींमुळे फडणवीस यांचा नाइलाज झाल्याचे समजते; तर या घडामोडींवर भाजपचा सत्तेतील जोडीदार असलेल्या शिवसेनेची करडी नजर आहे.

कॉंग्रेसने शब्द पाळला नसल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या राणे यांनी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले. भाजपमधील त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या भेटीत राणे यांचा भाजपमधील प्रवेश आणि पुढील राजकीय वाटचाल याविषयी निश्‍चित पावले उचलली जातील. राणे यांनी शिवसेनेत असताना मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. महसूल, उद्योग यांसारखी महत्त्वाची खातीही सांभाळली आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांना मनासारखे खाते देण्यात येईल. मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारामध्ये राणे यांचा समावेश केला जाण्याची शक्‍यता भाजपमधील सूत्रांकडून व्यक्‍त केली जात आहे.

शिवसेना आक्रमक होणार
नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून शिवसेना राणे यांना शत्रू मानते. राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देणे शिवसेनेला रुचणार नाही. त्यामुळे राणे यांच्या भाजपप्रवेशावर शिवसेनेची करडी नजर आहे. राणे यांच्या पक्षप्रवेशानंतर आणि मंत्रिमंडळातील समावेशानंतर शिवसेना आणखी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: mumbai news narayan rane involve in mantrimandal