माणसा, प्राण तळमळला! 

मंगेश सौंदाळकर
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पर्याय कोणते? 
- चौपाट्यांवर कचराकुंड्या ठेवणे. 
- त्यात कचरा फेकण्याची सवय लोकांना लावणे. 
- चौपाट्यांच्या स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढवणे. 
- पर्यटकांना प्लॅस्टिक ठेवण्यासाठी कापडी पिशव्या देणे. 

मुंबई - राज्यातील चौपाट्यांचा श्‍वास प्लॅस्टिकमुळे गुदमरला आहे. नाल्यातील प्लास्टिकयुक्त कचरा आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी समुद्रात सोडले जात असल्याने चौपाट्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यांची वारंवार स्वच्छता करणे हा लघुपर्याय असला, तरी दीर्घकालीन पर्याय शोधणे आवश्‍यक आहे. कारण प्लॅस्टिकच्या भस्मासुराने समुद्रावर हल्ला केला आहे. 

चौपाट्या अस्वच्छ होण्याची अनेक कारणे आहेत. जमिनीवरील कचरा थेट समुद्रात फेकला जातो. शहरांचे सांडपाणीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते. मुंबईचा विचार केला, तर नाल्यात फेकलेला प्लॅस्टिकयुक्त कचरा समुद्रात जातो. मिठी नदीच्या प्रवाहाबरोबर असा शेकडो टन कचरा समुद्रात जातो. तो वर्सोवा, माहीमची खाडी आणि जुहूच्या चौपाट्यांना लागतो. धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईतील कचरा रायगड जिल्ह्यातील चौपाट्यांवरही आढळू लागला आहे. तेथील नागरिक त्याबद्दल तक्रारी करीत आहेत. प्लॅस्टिकमुळे सागरी संपत्तीलाहा धोका निर्माण झाला आहे. माशांच्या पोटात प्लॅस्टिकचा भस्मासुर आढळू लागला आहे. 

चौपाट्यांची स्वच्छता पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाची असते; परंतु दुर्दैव असे, की पर्यटकही आपल्याकडील प्लॅस्टिक समुद्रात फेकतात. त्याचबरोबर मालवाहू जहाजे किनाऱ्यावर किंवा खोल समुद्रात कचरा फेकतात. 10 सागरी मैलापेक्षा कमी अंतरावर कचरा फेकल्यास अशा जहाजांवर नौकानयन मंत्रालय कारवाई करते. 

चौपाट्यांवरील अतिक्रमण हटवून तेथे स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. प्लॅस्टिकला समुद्रात जाण्यापासून रोखणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ त्यासाठी कार्यक्रम राबवत आहे. 
- अतुल पाटणे, सीईओ, एमएमबी 

चौपाट्या स्वच्छ करण्याकरिता तरुणाई सरसावली आहे. त्यांच्यामध्ये हळूहळू जागृती होत आहे. "एमएमबी'ने राज्यात 72 चौपाट्यांवर निर्मल तट सागर अभियान हाती घेतले आहे. 
- जितेंद्र रायसिंघानी, उपसंचालक (नियोजन), एमएमबी 

कचऱ्यात 50 टक्के प्लॅस्टिक 
राज्याला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने (एमएमबी) "निर्मल तट सागर अभियान' राबवले जात आहे. किनाऱ्याच्या या स्वच्छता मोहिमेत एमएमबी आणि स्थानिक नागरिक सहभागी होतात. वर्षभरापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. चौपट्यांच्या स्वच्छता मोहिमेत आतापर्यंत 500 टन कचरा बाहेर काढण्यात आला आहे. या कचऱ्यात 50 टक्के प्लॅस्टिक होते.

Web Title: mumbai news plastic beach Chowpatty