पंतप्रधान आवास योजनेची कासवगती 

तेजस वाघमारे
शनिवार, 24 जून 2017

मुंबई - मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 एप्रिलला राज्यातील पंतप्रधान आवास योजनेची सुरवात करण्यात आली. दोन महिन्यांत म्हाडाच्या विविध मंडळांच्या अखत्यारीत असलेल्या केवळ सात प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत. उर्वरित प्रकल्प विविध मंजुऱ्यांमध्ये अडकले आहेत. 

मुंबई - मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 एप्रिलला राज्यातील पंतप्रधान आवास योजनेची सुरवात करण्यात आली. दोन महिन्यांत म्हाडाच्या विविध मंडळांच्या अखत्यारीत असलेल्या केवळ सात प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत. उर्वरित प्रकल्प विविध मंजुऱ्यांमध्ये अडकले आहेत. 

केंद्र सरकारने 2022 पर्यंत "पंतप्रधान आवास योजना - सर्वांसाठी घर' ही योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी म्हाडाच्या सहा विभागांमार्फत राज्यभरात घरे उभारण्यात येणार आहेत. राज्यातील या योजनेची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे झाली; परंतु प्रत्यक्षात या प्रकल्पातील नागपूर, अमरावती आणि पुणे येथील प्रत्येकी दोन प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत. म्हाडाच्या कोकण, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि नागपूर या मंडळांमार्फत राज्यात 42 हजार घरे बांधण्यात येत आहेत. यापैकी सुमारे 32 हजार घरे एकट्या कोकण मंडळाच्या अखत्यारीत आहेत. 

कोकण मंडळामार्फत ठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी ही योजना राबवण्यात येत आहे; मात्र या प्रकल्पांसाठी पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नाही. प्रकल्प आराखड्यासही मंजुरी नसल्याने या प्रकल्पांचे बांधकाम रखडले आहे. राज्यातील नागपूर, अमरावती, पुणे येथील प्रत्येकी एका प्रकल्पाला पर्यावरण विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील. कोकण मंडळामार्फत शिरढोण येथे 16 हजार 548, खोणी येथे 8 हजार 810, घोटेघरमध्ये 3808, भंडार्ली येथे 2096 आणि तेथीलच दुसऱ्या प्रकल्पात 848 घरे बांधण्यात येणार आहेत. 

प्रकल्प लवकरच सुरू होतील - बास्टेवाड 
लातूर येथील एका प्रकल्पाचे काम देण्यात आलेल्या विकसकाचे न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. राज्यातील सात प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. आणखी काही प्रकल्पांची कामे काही दिवसांत सुरू होतील. पर्यावरणाची मंजुरी आवश्‍यक असलेले प्रकल्पही लवकरच सुरू होतील, असे म्हाडाचे सचिव डॉ. बी. एन. बास्टेवाड यांनी सांगितले. 

Web Title: mumbai news PM housing scheme