राजधानी एक्‍स्प्रेसमधील "अंबुज'ची केटरिंग सेवा बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबई - स्वर्ण जयंती राजधानी एक्‍स्प्रेसमधील अंबुज हॉटेलची खानपान (केटरिंग) सेवा बंद करण्याच्या पश्‍चिम रेल्वेने घेतलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. 

मुंबई - स्वर्ण जयंती राजधानी एक्‍स्प्रेसमधील अंबुज हॉटेलची खानपान (केटरिंग) सेवा बंद करण्याच्या पश्‍चिम रेल्वेने घेतलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. 

अहमदाबाद आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या या एक्‍स्प्रेसमधील केटरिंग सेवा बंद करण्याबाबत मार्चमध्ये रेल्वेने घेतलेल्या निर्णयाला अंबुज हॉटेल व रियल इस्टेट प्रा. लि. या कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पश्‍चिम रेल्वेने घेतलेला निर्णय एकतर्फी आणि मनमानी असल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र याचिकेतील मुद्दे पटण्याजोगे नसल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाचे न्या. अनुप मोहता व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली. 

राजधानी एक्‍स्प्रेसच्या प्रवाशांकडून या केटरिंगबद्दल बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. आमदार, खासदार तसेच सामान्य नागरिकांनीही सोशल मीडियावर टीका केली होती. खानपानाच्या सोयीसुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागण्याबाबतच्या तक्रारींची संख्या जास्त असल्याचे पश्‍चिम रेल्वेचे वकील सुरेश कुमार यांनी खंडपीठाच्या निदर्शनाला आणले. पश्‍चिम रेल्वेची प्रतिष्ठा जपण्यासाठी नोटीस देऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. राजधानी एक्‍स्प्रेसमधील या केटरिंग सेवेसाठी 2015 मध्ये कंत्राट देण्यात आले होते; मात्र 13-14 महिन्यांत तब्बल 133 तक्रारी आल्यानंतर हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर कंत्राटदारांनी एकूण प्रवासांपैकी फक्त 0.02 टक्के लोकांनी तक्रार केल्याचे उत्तर दिले होते. आईस्क्रीमच्या बदल्यात फ्रोझन डेझर्ट, संध्याकाळच्या गोड स्नॅक्‍सच्या बदल्यात मफीन्स, जेवणातील भाज्यांमध्ये कमी प्रमाणात पनीर तसेच वेलकम ड्रिंक प्रवाशांना दिले नाही. नाश्‍त्यासोबत चहा-कॉफी देण्यास उशीर झाला किंवा दिलीच नाही, जेवणाआधीचे स्टार्टर मागूनही दिले गेले नाही, अशा स्वरूपाच्या क्षुल्लक तक्रारी असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे होते. या तक्रारींकडे रेल्वेने दुर्लक्ष करणे अपेक्षित होते; पण त्यांनी या तक्रारींना प्राधान्य देऊन कंत्राट रद्द केल्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती.

Web Title: mumbai news Rajdhani Express catering service