शिवसेनेचा रामनाथ कोविंद यांना पाठिंबा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 जून 2017

"जीएसटी'संदर्भातच्या शिवसेनेच्या मागणीमुळे महापालिकांना अनुदान मिळणार आहे. आता, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्‍नही असाच सोडवू. 
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख 

मुंबई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रपतिदाच्या सलग दोन निवडणुकांत शिवसेनेने "एनडीए'च्या विरोधात निर्णय घेतला होता. त्यामुळे यंदाही शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. 

राष्ट्रपतिपदाच्या भाजपने ठरवलेल्या उमेदवाराच्या पाठिंब्यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी "मातोश्री' येथे शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. विरोधकांकडून उमेदवार जाहीर झालेला नाही. तसेच, कोविंद यांना विरोध करण्याचे कारण नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी बैठकीत व्यक्त केली. त्यामुळे कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. बैठकीनंतर "मातोश्री' येथे पत्रकार परिषदेत उद्धव यांनी हा निर्णय जाहीर केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त काल झालेल्या मेळाव्यात जातीय राजकारणासाठी कोविंद यांना उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप उद्धव यांनी केला होता. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ठाकरे म्हणाले, की कोविंद हे साधे-सरळ आहेत. सामान्य कुटुंबातून ते या स्तरावर पोचले आहेत. चांगले काम करणार असतील तर पाठिंबा द्यायला काय हरकत आहे? भाजपच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याचे काम शिवसेना करत नाही; पण जे आवडत नाही त्याला विरोध करतच राहू. 

राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेने सरसंघचालक मोहन भागवत आणि कृषितज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांची नावे सुचवली होती; मग आता कोविंद यांना पाठिंबा कसा दिला, या प्रश्‍नावर उद्धव म्हणाले, स्वामिनाथन यांच्या नावाचा विचार भाजपने केला होता. मात्र, त्यांच्या वयामुळे उमेदवारी देता आली नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून स्वामिनाथन यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यावर "आम्ही नाव सुचवून खूप दिवस झाले. आताही ते विचार करत आहेत?' असा टोला उद्धव यांनी विरोधकांना मारला. 

दिवसभरात... 
- शिवसेनेनेही पाठिंबा दिल्यामुळे रामनाथ कोविंद यांचे पारडे जड 
- बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, टीडीपी आणि वायएसआर कॉंग्रेसचा आधीच पाठिंबा 
- सर्वांच्या पाठिंब्याबद्दल कोविंद यांनी मानले आभार 
- कोविंद यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट 
- बिहारच्या राज्यपालपदाचा कोविंद यांचा राजीनामा 
- कोविंद यांना "एनएसजी'ची सुरक्षा

Web Title: mumbai news ramnath kovind shivsena