भारतात धावणार लाल बुलेट ट्रेन

संतोष मोरे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

भारतात सुरवातीला दोन बुलेट ट्रेन धावतील. त्यातील एका गाडीला केवळ तीन-चार थांबे असतील, तर दुसरी बुलेट ट्रेन एक्‍स्प्रेसप्रमाणे थांबे घेईल. 2015 मध्ये या प्रकल्पाचा करार झाला. त्या वेळी त्याची किंमत एक लाख आठ हजार कोटी होती. त्यात सध्या तरी वाढ झालेली नाही; मात्र भविष्यात वाढीची शक्‍यता आहे.
- धनंजय कुमार, जनसंपर्क अधिकारी, एनएचएसआरसी

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम यंदा जूनमध्ये सुरू होणार आहे. जपानमध्ये हिरव्या रंगाची बुलेट ट्रेन धावते; मात्र, भारतात लाल रंगाची बुलेट ट्रेन धावणार आहे. 2022 मध्ये ती प्रवाशांच्या सेवेत येईल. मुंबई-अहमदाबाद या 508 कि.मी. मार्गावर बुलेट ट्रेन ताशी 330 कि.मी. वेगाने धावेल आणि अवघ्या दोन तासांत अंतर पार करेल.

भारतात चार हजार 100 कि.मी. मार्गावर बुलेट ट्रेनचे प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मुंबई-पुणे, मुंबई-नागपूर, दिल्ली-कानपूर, दिल्ली-चेन्नई, चेन्नई-बंगळूर-म्हैसूर, दिल्ली-कोलकता, चेन्नई-हैदराबाद, मुंबई-नागपूर, मुंबई-चेन्नई, दिल्ली-चंडीगड, नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-बिलासपूर या मार्गांचा समावेश आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सर्व प्राथमिक चाचण्या रेल्वे मंडळाकडून घेण्यात येणार आहेत. त्या पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात जूनपासून काम सुरू करू, असे "नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन'चे (एनएचएसआरसी)चे जनसंपर्क अधिकारी धनंजय कुमार यांनी सांगितले.

बुलेट ट्रेन प्रकल्पात 54 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. त्यात चार हजार पदे कायमस्वरूपी असतील, तर उर्वरित पदे कंत्राट व रेल्वेमार्फत भरली जाणार आहेत. या प्रकल्पाचे कामकाज जाणून घेण्यासाठी 325 कर्मचाऱ्यांना जपान येथे विशेष प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. सध्या बुलेट ट्रेन प्रकल्पात 100 जणांचे पथक कार्यरत आहे.

Web Title: mumbai news red bullet train