शिवसेनेचे हे नेहमीचेच 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

अदृश्‍य पाठिंबा 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा-सात महिन्यांपूर्वी सरकारला अनेक अदृश्‍य शक्‍तींचा पाठिंबा असतो, त्यामुळे सरकार कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही, असे स्पष्ट केले होते. निवडणुका लवकर होणे कोणत्याही पक्षाच्या आमदाराला परवडणारे नाही, असेही म्हटले जात आहे. 

मुंबई - सरकारला अल्टिमेटम देत बाहेर पडण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आले असले तरी भारतीय जनता पक्षाने मात्र हे नेहमीचेच, असे म्हणत आजच्या बैठकीवर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यत्वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातत्याने संपर्क असतो. त्यामुळे सरकारला सध्या कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत होते. अर्थात कोणताही वेगळा निर्णय झाल्यास सरकारला वाचवण्यासाठी अदृश्‍य हात तयार असल्याचेही स्पष्ट करण्यात येत होते. 

शिवसेनेने सरकारला अल्टिमेटम देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात येत्या वर्षभरात त्यासंबंधात कोणताही टोकाचा निर्णय शिवसेना घेणार नाही, अशी भाजपची अटकळ आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणे शक्‍य नसल्याने शिवसेना निवडणुकीपूर्वी वेगळा निर्णय घेऊ शकते. अशा वेळी लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका घेणे किंवा अल्पमतातील सरकार चालवणे हे दोन्ही पर्याय खुले आहेत. महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याकडेही भाजपच्या नेत्यांनी लक्ष वेधले. 

Web Title: mumbai news shiv sena bjp