संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 जून 2017

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत संपूर्ण सातबारा कोरा करा, कर्जमाफी द्यायची नसेल तर स्पष्ट शब्दांत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशा शब्दांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आज मागणी केली. यावर येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते. 

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी काल झालेल्या बैठकीतील निर्णय चंद्रकांत पाटील यांनी सांगितला. मात्र या निर्णयाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी विरोध केला. जाचक अटी न लावता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा आग्रह त्यांनी धरला. या वेळी राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगगितले. निकष लावल्याखेरीज निर्णय घेणे अडचणीचे ठरेल, त्यामुळे यावर विचारविनिमय करण्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. 

पाटील घेणार ठाकरेंची भेट 
कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी राज्यसरकारने नेमलेल्या मंत्रिगटाच्या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दालनात पाटील यांनी कदम यांच्यासोबत तासभर चर्चा केली. या वेळी शेतकऱ्यांना पेरणीसाठी द्यावयाच्या 10 हजार रूपयांच्या शासन निर्णयात सुधारणा करण्यावर चर्चा झाली. राज्यात पेरण्या सुरू आहेत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या तरी बॅंका शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची उचल देत नाहीत. ही बाब न पटणारी असल्याची खंत कदम यांनी पाटील यांच्याकडे व्यक्‍त केली. संबंधित शासन निर्णयातील जाचक अटी काढून नवीन आदेश काढण्यावर या दोघांच्या बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: mumbai news shiv sena loan farmer