समाजमाध्यमांचे स्वातंत्र्य लोकशाही बळकट करणारे - सुरेश प्रभू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई - भाजप सरकार देशात विकास आणि स्वातंत्र्य देण्याचे काम करीत आहे. या सरकारने समाजमाध्यमांना दिलेले स्वातंत्र्य हे लोकशाही बळकट करणारे आहे. तसेच समाजमाध्यमांवरील आविष्कार हे सुदृढ लोकशाही असल्याचे प्रतीक आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे व्यक्त केले. 

मुंबई - भाजप सरकार देशात विकास आणि स्वातंत्र्य देण्याचे काम करीत आहे. या सरकारने समाजमाध्यमांना दिलेले स्वातंत्र्य हे लोकशाही बळकट करणारे आहे. तसेच समाजमाध्यमांवरील आविष्कार हे सुदृढ लोकशाही असल्याचे प्रतीक आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे व्यक्त केले. 

मुंबई भाजपतर्फे आज दादर वसंत स्मृती सभागृहात आणीबाणीविरोधी दिन आयोजित करण्यात आला होता. या वेळी आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड्‌. आशीष शेलार होते. कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुंबईचे संघटनमंत्री सुनील कर्जतकर, महामंत्री सुमंत घैसास उपस्थित होते. 

प्रभू म्हणाले की, देशातील आणीबाणी खऱ्या अर्थाने जनतेने उधळून लावली. त्या वेळी उभे राहिलेले जनआंदोलन अभूतपूर्व होते. 58 दिवसांच्या आणीबाणीनंतर जेव्हा निवडणुका लागल्या, त्या वेळी आजसारखी प्रसिद्धिमाध्यमे आणि इंटरनेट उपलब्ध नव्हते. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते अटकेत होते. अशा वेळी इंदिरा गांधी आणि तत्कालीन आणीबाणी समर्थकांच्या विरोधात या देशात जनमानसात प्रक्षोभ निर्माण झाला. महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम लेखक पु. ल. देशपांडे यांनी आणीबाणीच्या विरोधात उडी घेतली. अशी अनेक माणसे या विरोधात उभे राहिली. त्या वेळच्या निवडणुका अभूतपूर्व झाल्या आणि देशात सत्तांतर झाले. आणीबाणी उलथून लावण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मोठा वाटा होता. 

मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार ऍड्‌. आशीष शेलार म्हणाले की, आजच्या दिवशी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे एकच भूमिका आहे. नव्या पिढीला हा देशातील आणीबाणीचा काळा इतिहास माहीत होण्याची गरज आहे. या देशात इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी लादली, ती आपल्या राजकीय स्वार्थापोटी लादली होती, हा इतिहास आहे आणि तरीही आज या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर सहिष्णुता आणि असहिष्णुतेच्या गोष्टी कॉंग्रेस करत आहे. असहिष्णुतेच्या खोट्या गोष्टी उपस्थित करून भाजप सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. 

Web Title: mumbai news suresh prabhu