‘इसिस’चा संशयित दहशतवादी गजाआड

‘इसिस’चा संशयित दहशतवादी गजाआड

मुंबई - ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबधित असलेल्याला एकाला आज पहाटे उत्तर प्रदेश दहशतवादीविरोधी पथकाने (यूपी एटीएस) सहार विमानतळावरून अटक केली. आबू जाहिद सल्लाउदीन शेख ऊर्फ आबू जैद असे त्याचे नाव आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर लखनौला नेले जाणार आहे. आबूने व्हॉट्‌सॲपवर तीन ग्रुप केले होते. ग्रुपमधून तो दहशतवादांशी संबधित माहिती व्हिडिओ पोस्ट करायचा. त्यांनी देशात बाँबस्फोट घडवून आणण्याकरता पैसेही गोळा केले होते, मात्र अपुऱ्या पैशांमुळे त्यांचा कट फसला. 

एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेश ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी चार जणांना उत्तर प्रदेशातून अटक केली होती. त्यात मुंबईतील एकाचा सहभाग होता. उमर ऊर्फ नाजिम, गाजीबाबा ऊर्फ मुज्जमिल, मुफ्ती ऊर्फ फैजान आणि जवनान ऊर्फ फैजान अशी त्यांची नावे आहेत. ते चौघेही ‘इसिस’साठी काम करायचे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात असायचे. त्यांच्या चौकशीत आबूचे नाव समोर आले. आबूच्या विरोधात ‘यूपी एटीएस’ने ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली होती. तो भारतात येणार असल्याची माहिती ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांना मिळाली. शनिवारी रात्रीच ‘यूपी एटीएस’चे सहायक आयुक्त अनुप सिंह आणि विश्‍वजित सिंह यांचे पथक मुंबईत आले. पहाटे आबू विमानतळावर आला. तेथून त्याला ‘एटीएस’ने ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले. आबूला ट्रान्झिट रिमांडवर लखनौला नेले जाणार आहे. 

आबू आझमगडचा 
आबू हा मूळचा आझमगडचा रहिवासी आहे. त्याने पाचवीपर्यंत मदरशात शिक्षण घेतले. शिक्षण सोडल्यानंतर तो छोटी कामे करायचा. एकाच्या संपर्कात आल्यावर तो नोकरीकरिता सौदीला गेला. तेथे गेल्यावर तो ‘इसिस’च्या संपर्कात आला. 

व्हॉट्‌सॲपवर केले ग्रुप्स
दहशतवादी कारवायांनी प्रेरित झाल्यावर आबू हा ‘इसिस’साठी काम करू लागला. सुरवातीला त्याने स्वत:चा ग्रुप तयार केला. त्यानंतर  इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते. 

विघातक ‘बिजनोर मोड्यूल’
आबू हा ‘बिजनोर मोड्यूल’शी संबधित आहे. या मोड्यूलच्या माध्यमातून देशविघातक कृत्ये केली जाणार होती. शस्त्रांची खरेदी आणि पैसे गोळा करण्याचे काम केले जात होते. त्यांनी देशात बाँबस्फोट घडवून आणण्याकरता पैसेही जमा केले होते; पण खर्च पेलावणार नसल्याने कट फसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com