पर्यटनस्थळी ई-वाहने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई - राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी लवकरच सायकलसारखी ई-वाहने चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी ई-वाहनांचा झोन तयार करण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

पाचगणी, महाबळेश्‍वर या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सायकलचा वापर केला जाणार आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादावर राज्यातील समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, इतर हिल स्टेशनच्या ठिकाणीही अशा प्रकारच्या ई-वाहनांचा अधिकाधिक वापर करण्याचा सरकारचा मानस आहे.

स्थानिक पर्यटकांसोबतच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने राज्य सरकार पर्यटनात विविध प्रयोग करत आहे. राज्यात सर्वाधिक पर्यटक मुंबई, औरंगाबाद, पुणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये येतात. त्यामुळे तेथील पर्यटकांना योग्य माहिती मिळावी यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले गाईड नेमण्यात आले आहेत. यासाठी गाईड प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे. राज्यात शेती पर्यटनाला मोठा वाव आहे. कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळत असल्याने तसेच यामुळे ग्रामीण विकास आणि रोजगाराचा प्रश्‍नही मार्गी लागणार असल्याने कृषी पर्यटनावर सरकार विशेष लक्ष देत आहे. याशिवाय सध्या मेडिकल टुरिझमवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण बरा होत असतानाच त्याला आजूबाजूची ठिकाणे दाखविण्यासोबतच त्याच्या नातेवाइकांच्या राहण्याची सोय चांगल्या पद्धतीने कशी करता येईल, याची योजना तयार करणे सध्या सुरू आहे. याशिवाय ऐतिहासिक दर्जाला धक्का न लागता राज्यातील गड-किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयएनएस विराट या युद्धनौकेला वसई-विरारच्या समुद्रकिनाऱ्यावर नेऊन तिथे नौदल, लष्कर पार्क करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे, असेही रावल म्हणाले.

क्रुझ पर्यटनावरही भर
येत्या चार वर्षांत देशात तब्बल ९५० क्रुझेस येणार असून, त्यातील ८० टक्के क्रुझ मुंबई भेटीवर असणार आहेत. त्यामुळे या क्रुझच्या स्वागतासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ तयार करण्यासोबत या क्रुझचा वापर पर्यटनासाठी कसा करता येईल यासाठी कार्निव्हल कंपनीचे मालक डेव्हिड यांनी सरकारला सादर केलेल्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सध्या सुरू आहे. एमटीडीसीकडून हे पॅकेज तयार केले जात असल्याचेही रावल यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news Tourist places E-Vehicles