मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

म्हणून सरसंघचालक... 
भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे सांगण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्‍यकता नाही. म्हणून राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते. मात्र काहींना अडचण असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषितज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांचे नाव सुचवले होते. 

मुंबई - "मतांच्या राजकरणासाठी दलित राष्ट्रपती करणार असाल तर आम्हाला रस नाही,'' अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला आव्हान देतानाच राष्ट्रपती देशाचे भले करणार असेल, तर मी तुमच्या सोबत आहे, अशी मवाळ भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे घेतली. "मस्ती असेल तर मुदतपूर्व निवडणुका घ्याच,' असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. शिवसेना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत मंगळवारी निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. 

ंषण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या 51 व्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी भाजपवरच हल्ला चढवला. वेगवेगळ्या राज्यातील राजकरणानुसार गोमांस बंदीचा निर्णय होतो. एक पंतप्रधान आहे मग साऱ्या देशात एक निर्णय का नाही, देशभरात गोमांस बंदी होणार नसेल तर समान नागरी कायदा कसा लागू होणार, असा प्रश्‍न विचारात त्यांनी भाजपवर तोफ डागली. राष्ट्रपतिपदासाठी भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले. त्याबद्दल ठाकरे म्हणाले, ""राष्ट्रपती कोण होणार यामुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडणार? मात्र, दलित समाजाच्या मतांसाठी दलित राष्ट्रपती करणार असाल तर आम्हाला रस नाही. राष्ट्रपती जर फक्त दलितांचाच नाही तर देशाचे भले करणारा असेल तर शिवसेना तुमच्यासोबत आहे.'' 

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राज्यात मुदतपूर्व निवडणुकांची चर्चा पुन्हा सुरू आहे. त्यावर बोलताना ठाकरे यांनी ""सतत जिंकत जाऊ असे समजू नका. आता वातावरण तुमच्या विरोधात आहे. मस्ती असेल तर मुदतपूर्व घेऊनच दाखवा आम्ही तयार आहोत,'' असे आव्हान भाजपला दिले. "आम्हाला "मुदतपूर्व'ची नाही शेतकरी आत्महत्येची चिंता वाटते. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करूनच घेऊ. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वेड्यावाकड्या अटी टाकून शेतकऱ्यांना गांगरून टाकणार असाल तर तो कागद आम्ही फाडून टाकू. शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने कर्जमुक्ती द्या,'' अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. 

म्हणून सरसंघचालक... 
भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे सांगण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्‍यकता नाही. म्हणून राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते. मात्र काहींना अडचण असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषितज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांचे नाव सुचवले होते. 

मंगळवारी निर्णय 
"शिवसेनेच्या नेत्यांची मंगळवारी (ता. 20) "मातोश्री'वर बैठक होणार आहे. त्यात बैठकीत राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करू. त्यानंतर भूमिका मांडू,'' असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

बेळगाव मुद्द्यावरूनही हल्ला 
कर्नाटकात कोणत्याही पक्षाचे सरकार आले, तरी बेळगावतील मराठी माणसावर अन्याय करतात. त्यावर भाजपचे सरकार निषेधाचे पत्र पाठवतात. राज्यात असलेला एकही राष्ट्रीय पक्ष त्यावर बोलत नाही. शिवसेना नेहमीच सीमा भागातील माणसांच्या बाजूने उभी राहिली आहे. पण हा असाच अन्याय सुरू राहिला तर शिवसेना 1969 सारखे तीव्र आंदोलन सुरू, असा इशाराही त्यांनी दिला. 

Web Title: mumbai news uddhav thackeray shiv sena