लघु उद्योजकांसाठी तंत्रज्ञान आणि वित्त सेवांमध्ये सुधारणा करणार - ऊर्जित पटेल

लघु उद्योजकांसाठी तंत्रज्ञान आणि वित्त सेवांमध्ये सुधारणा करणार - ऊर्जित पटेल

मुंबई - मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांच्या (एमएसएमई) आर्थिक गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञान आणि वित्त सेवांतील सुधारणांसोबत डिजिटल व्यासपीठ विकसित करण्यात येणार आहे. "एमएसएमई'साठी वित्त पुरवठा करणाऱ्या "सीजीटीएमएसई' या योजनेच्या अंमलबजावणीवर "आरबीआय'ची देखरेख असून लघु उद्योजकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी दिली. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीतर्फे गुरुवारी (ता.22) घेण्यात आलेल्या 9 व्या बॅंकिंग आणि वित्त परिषदेत ते बोलत होते. 

एमएसएमई क्षेत्र सध्या संक्रमणातून जात आहेत. नवनव्या संकल्पना, कुशल मनुष्यबळामुळे हे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. एमएसएमईंना विना अडथळा पतपुरवठा उपलब्ध होण्यावर भर दिला आहे. क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो ऍण्ड स्मॉल एंटरप्राइजेस (सीजीटीएमएसई) योजनेमुळे लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना थेट वित्तसाह्य मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीवर आरबीआय लक्ष ठेवून असल्याचे पटेल यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्या संकटात असल्याचे भाकीत केले जात असले तरीही पटेल यांनी मात्र "स्टार्टअप' या क्षेत्रातील बेरोजगारांना सामावून घेतील, असे सांगितले. महागाईबाबत आरबीआय गंभीर आहे. विकासाला बाधा न पोहचवता महागाई नियंत्रणाला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. "आयएमसी'चे तब्बल 86 टक्के एमएसएमई सदस्य असून भांडवल, टेक्‍नॉलॉजी आणि धोरणांवर विचार झाला पाहिजे, असे आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दीपक प्रेमनारायण यांनी यावेळी सांगितले. 

मोबाईल बॅंकिंगला प्रोत्साहन देणार 
कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोबाईल बॅंकिंग सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचे आरबीआयचे उद्दिष्ट आहे. 

नुकतीच "यूपीआय'मधील तंत्रज्ञानात महत्त्वाची सुधारणा झाली आहे. यामुळे ग्राहकाला स्मार्टफोनमधल्या एकाच ऍप्लिकेशनमधून दोन बॅंक खाती हाताळता येणार आहेत. मोबाईल तंत्रज्ञान ग्राहकाभिमुख करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या जातील. बॅंकिंग व्यवहारांचा वेळ कमी करण्यासाठी नवी ऍप्लिकेशन विकसित करण्याला "आरबीआय'ने प्राधान्य दिल्याचे पटेल यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com