तरुणांमध्ये वाढतोय बहिरेपणा

तरुणांमध्ये वाढतोय बहिरेपणा

मुंबई - आयटी कंपन्यांतील नोकरदारांकडून कानाला हेडफोन लावून सातत्याने केला जाणारा संवाद, कर्णकर्कश आवाजात गाणी ऐकण्याची वाढलेली सवय, वाहनांचा गोंगाट, बीआरटीपासून ते रस्ते, घरांसाठी होणारे खोदकाम आणि बांधकामांच्या आवाजामुळे तरुणांमध्ये काही वर्षांच्या तुलनेत बहिरेपणा दुपटीने वाढला आहे. विशेष म्हणजे, आयटी क्षेत्रातली तरुणांना अधिक त्रास होत असून कानात रातकिड्याचा आवाज वाजणे आणि कानदुखीच्या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. 

दिवाळीतील वाढते ध्वनिप्रदूषण विचारात घेता, शहरातील कान, नाक आणि घसातज्ज्ञांनी वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्याचे सांगितले. वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहनही डॉक्‍टरांनी केले आहे.  

दुचाकीवर मोबाईल वापरण्यास मनाई असली, तरी अद्याप असा प्रकार १०० टक्के थांबलेला नाही. अपघात टाळण्यासाठी कानात हेडफोन वापरण्याची फॅशन तरुणाईत आहे. हेडफोनचा अतिवापर, सातत्याने गाणी ऐकणे, मोबाईलवर बोलत राहणे आदी प्रकार महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढत आहेत. त्याशिवाय आयटी कंपन्यांमध्ये परदेशातील व्यक्तींशी संवाद साधताना हेडफोनचा वापर केला जातो. त्यामुळे आयटीयन्समध्ये बहिरेपणाचा आजार बळावला असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले. 

वाढती वाहने आणि शहरातील वाढत्या बांधकामांमुळेही ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे. त्याचे आवाज सातत्याने कानावर पडत असल्यामुळे महिलांमध्ये बहिरेपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

वेळीच उपाय हवेत
दहीहंडी, गणेशोत्सवात ढोल-ताशे, फटाके आणि ध्वनिक्षेपकांवरून होणारे ध्वनिप्रदूषण प्रासंगिक असले, तरीही त्याचा त्रास होतोच. वाहनांपासून बांधकामांपर्यंतच्या ध्वनिप्रदूषणाचा दैनंदिन त्रास सुरू होत असल्याने वेळीच ते रोखण्यासाठी उपाय आवश्‍यक आहेत, असे कान, नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. विजय केतकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com