Mumbai Rains : ...तर मुंबई मनपा बरखास्त करून टाका- अजित पवार

Mumbai Rains : ...तर मुंबई मनपा बरखास्त करून टाका- अजित पवार

मुंबई - 20 वर्षापेक्षा जास्त काळ मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र सगळं व्यवस्थित काम करत आहे असं सांगितलं जातंय. महापौर, उपमहापौर चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा वेळ पडली तर प्रशासक आणा, मनपा बरखास्त करून टाका अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज (ता.02) विधानसभेत केली.

मुंबईसह राज्यात कोसळलेल्या जलसंकटावर बोलताना अजित पवार यांनी शिवसेनेसह सरकारवर निशाणा साधला. मुंबई तुंबल्यावर यांच्या कामाची पोलखोल होते त्यामुळे याच्या खोलात जावून चौकशी व्हावी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा त्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाही अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला.

मनुष्याला एकदाच जन्म मिळतो त्यामुळे किडयामुंग्यासारखं लोकं मरत असतील तर हे सरकारचे अपयश आहे. हा सरकारचा कमीपणा आहे. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत ही जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली. 

मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. लोकांचा जीवाला धोका आहे. लोकं जखमी झाले आहेत. त्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी करतानाच गेलेली व्यक्ती भरीव मदत दिल्यामुळे परत येत नाही. कर्ती व्यक्ती गेली की, घर आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होते. ती व्यक्ती परराज्यातील, परजिल्हयातील असो असेही अजित पवार म्हणाले.

मुंबई ही तुमची माझी देशाची आर्थिक राजधानी पुर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईत पाणी तुंबले आहे आणि मुंबईचे प्रथम नागरीक मुंबई तुंबली नाही असं सांगत आहेत. काय केल्यावर मुंबई तुंबली हे यांना कळणार आहे असा प्रश्नही अजित पवार यांनी केला.

मिठी नदीचा मुद्दाही यावेळी अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. मिठी नदीसाठी केंद्राने आर्थिक मदत केली आहे आणि राज्यसरकार वेळोवेळी मदत करत आहे असं असताना मिठी नदीचे काम का पुर्ण नाही अशी विचारणा केली. मुंबईकरांना सकाळपासून त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस पडला की याची चर्चा होते. ही तेवढ्यापुरती चर्चा होवून तेवढ्यापुरतं उत्तर मिळतं परंतु याची जबाबदारी कुठल्या खात्यावर आहे हे सांगितले जात नाही. कामाचा दर्जा चांगला राहणार नसेल तर हे सरकारला भूषणावह नाही असेही अजित पवार म्हणाले.

पुण्यातील कोंढवा, सिंहगड परिसरातील दुर्दैवी घटना असेल किंवा मुंबईतील मालाड परिसरातील दुर्दैवी घटना असो याबाबत अजित पवार यांनी बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित अधिकारी यांच्या एकंदरीत कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com