26/11 हल्ला : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली, पण अजित पवार... 

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यास आज (मंगळवार) 11 वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. पण, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुपस्थिती प्रकर्षाने जाणविली. 

मुंबईतील पोलिस जिमखान्याच्या मैदानावर आज सकाळी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपालांसह, मुख्यमंत्री व अन्य भाजपचे नेते यावेळी उपस्थित होते. पण, अजित पवार येथेही अनुपस्थित होते. त्यांनी अद्याप उपमुख्यमंत्रीपदाचा पदभारही स्वीकारलेला नाही. तसेच ते काल सचिवांच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. त्यामुळे अद्याप अजित पवार द्विधामनस्थितीत आहेत की काय असे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सतत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज सकाळीच ते आपल्या निवासस्थानातून हॉटेल ट्रायडंटला गेले आहेत. त्यामुळे ते तेथे कोणाला भेटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या हल्ल्यानंतर पोलिसांनी अद्ययावत शस्त्रसामग्री व हेलिकॉप्टरची मागणी केली होती. या प्रस्तावाला दहा वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये राज्याच्या गृह मंत्रालयाने मंजुरी दिली; मात्र मुंबई पोलिसांना आजही हेलिकॉप्टरची प्रतीक्षाच आहे. हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) पथक हॉटेल ताजमहाल आणि छाबड हाउस येथे हेलिकॉप्टरने उतरले होते. वाहतूक कोंडीमुळे मुंबईत जवळच्या प्रवासालाही तासभर लागतो. त्याचप्रमाणे विस्तीर्ण समुद्र आणि खाडीकिनाऱ्यांवर गस्त घालणेही अवघड आहे. या समस्या ध्यानात घेऊन मुंबई पोलिसांनी भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी केली होती. या मागणीवर दहा वर्षे निर्णय झाला नव्हता. 

संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरच्या वापराची रूपरेषा 2008 मध्येच राज्य सरकारला सादर केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका झाल्यानंतर मागील वर्षी मुंबई पोलिसांना हेलिकॉप्टर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यानुसार हेलिकॉप्टर लवकरात लवकर मिळावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com