अमराठी भाषकांच्या मराठी प्रशिक्षणासाठी पुस्तक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

मराठी शिकण्यासाठी ॲपची निर्मिती
अमराठी भाषकांना मराठी शिकता यावे यासाठी एका विशेष ॲपची निर्मितीही करण्यात येत आहे. या ॲपच्या माध्यमातून मराठीतून संवाद कसा साधावा याचे मार्गदर्शन करण्यात येईल. अभ्यासक्रमात शिकवण्यात येणाऱ्या मजकुरातील काही भाग या ॲपवर उपलब्ध असणार आहे. या ॲपचे कामही २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे.

मुंबई - अमराठी भाषकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने स्वतंत्र मराठी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. या अभ्यासक्रमासाठी पुस्तकनिर्मितीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मराठी भाषेचा व्यवहार भाषा म्हणून करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमासाठी पुस्तकनिर्मिती सुरू आहे. या अभ्यासक्रमात संवाद कौशल्यावर भर देण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठात जशी जर्मन भाषा शिकवली जाते, तशी मराठी भाषा शिकवण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्थेने या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. 

अमराठी भाषकांसाठीचा हा अभ्यासक्रम प्रकल्प २०१७ ते २०२० या कालावधीत पूर्ण होणार आहे आणि तो सहा स्तरांवर तयार करण्यात येत आहे. आता त्यातील एक व दोन स्तरांचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या तीन व चार स्तरांचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. उर्वरित स्तरांचे काम पुढील वर्षात पूर्ण केले जाईल, अशी माहिती प्रकल्पाशी संलग्न असणाऱ्या प्रा. सोनाली गुजर यांनी दिली. लघु अभ्यासक्रमासह परिचारिका, बॅंक कर्मचारी, सरकारी अधिकारी, रिक्षा व टॅक्‍सीचालक या व्यावसायिकांसाठी पुस्तके तयार करण्यात येत आहेत. तयार करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये लिखित व व्याकरणावर भर न देता संवाद मूल्यावर अधिक लक्ष देण्यात आले आहे. जेणेकरून, या अमराठी भाषकांना व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करणे सुलभ होईल.

कुठेही भाषांतरांचा आधार घेतलेला नाही. रोजच्या जीवनातील प्रत्येकाच्या व्यवसायाच्या निगडित संवाद निवडून; तसेच संवादात्मक दृकश्राव्य फीत अशी उदाहरणे अभ्यासासाठी वापरण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai University marathi training book of non-marathi people