महानगरी मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती!

वृत्तसंस्था
बुधवार, 26 डिसेंबर 2018

'इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस' या हैदराबादमधील संस्थेने केंद्र सरकारकडे हा अहवाल सादर केला आहे. 

मुंबई : काही वर्षांपूर्वी झळकलेला '2012' हा चित्रपट अनेकांना आठवत असेल. त्यामध्ये काल्पनिक जगबुडीचे चित्रिकरण करण्यात आले होते. पण निदान मुंबईकरांना तरीही ही गोष्ट 'कविकल्पना' म्हणून सोडून देण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. 'येत्या शतकाच्या अखेरीस मुंबई पूर्णपणे पाण्याखाली जाईल', असा धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे. 

'स्वप्ननगरी म्हणून ख्याती असलेली मुंबई या शतकाच्या अखेरीस पाण्याखाली बुडणार आणि येथे महाप्रलय येण्याची शक्‍यता आहे', असा अहवाल केंद्र सरकारने संसदेमध्ये मांडला आहे. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरावेळी ही माहिती दिली आहे.

'इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस' या हैदराबादमधील संस्थेने केंद्र सरकारकडे हा अहवाल सादर केला आहे. 

या अहवालानुसार, देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील खंबाट आणि कच्छ किनारपट्टीलाही प्रलयाची भीती आहे. हे भागही या शतकाच्या अखेरीस पाण्याखाली जाऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आले आहे. केरळ आणि कोकणातील काही भागांमध्ये समुद्राची पातळी तीन ते 34 इंच इतकी वाढू शकते. 

Web Title: mumbai will be submerged very soon, as per reports