मुलांनो अभ्यासाला लागा, दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा झाल्यात जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे सुरक्षिततेची काळजी घेतली जातेय. कोरोनामुळेच यंदा परीक्षांचं तसेच  शाळेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची प्रतीक्षा आता संपली आहे. बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 दरम्यान, तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 दरम्यान घेतली जाणार आहे. 

राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येतात. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2020च्या परीक्षेचा निकाल दरवर्षीपेक्षा (जुलैमध्ये) उशिरा लागला. त्यानंतर दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आली. मात्र, त्यानंतर राज्यातील जवळपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष दहावी-बारावीच्या 2021मध्ये होणाऱ्या परीक्षांकडे लक्ष लागले होते. या परीक्षा कधी होणार?, हे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येत नव्हते. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक संभ्रमात होते. याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी बोर्डाच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येतील, असे जाहीर केले होते. 

दरम्यान, गायकवाड यांनी गुरुवारी ट्विटरद्वारे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा कळविल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिलला सुरू होतील आणि 29 मेपर्यंत संपतील. बारावीची निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तसेच दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिलला तर प्रात्यक्षिक परीक्षा 28 मेपासून सुरू होईल आणि 31 मे पर्यंत संपेल. या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले आहे. कोरोनाबाबत केंद्र व राज्य सरकार तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून या परीक्षांचे आयोजन करण्यात मान्यता देण्यात आल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai and Suburbs

बारावीच्या परीक्षेचा तपशील : 
- परीक्षा : परीक्षेचा कालावधी : संभाव्य कालावधी दिवस : 
- लेखी परीक्षा : 23 एप्रिल ते 29 मे 2021 : 37 दिवस 
- माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाइन परीक्षा : 27 मे ते 5 जून : 10 दिवस 
- प्रात्यक्षिक/श्रेणी सुधार /तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा : 27 मे ते 2 जून : 7 दिवस 

दहावीच्या परीक्षेचा तपशील : 
- परीक्षा : परीक्षेचा कालावधी : संभाव्य कालावधी दिवस : 
- लेखी परीक्षा : 29 एप्रिल ते 31 मे 2021 : 33 दिवस 
- प्रात्यक्षिक/श्रेणी सुधार /तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा : 28 मे ते 3 जून 2021 : 07 दिवस 
- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयांची परीक्षा : 28 मे ते 9 जून 2021 : 13 दिवस 

mumbai latest news ssc and hsc board exams dates and results declared by varshan gaikwad


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbi latest news ssc and hsc board exams dates and results declaired by varshan gaikwad