वाढला टक्का; कोणाला फटका?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - "मिनी विधानसभे'चा थरार आज संपला असून, आता उद्या (ता. 23) मतमोजणी होईल. राज्यातल्या जनतेचा कौल कोणत्या पक्षाला मिळणार, याची धाकधूक सुरू झाली आहे. दहा महापालिका, 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये यंदा मतदानाचा टक्‍का वाढलेला असल्याने याचा फटका कोणत्या पक्षाला बसणार, याचे आडाखे बांधायला सुरवात झाली आहे. 

मुंबई - "मिनी विधानसभे'चा थरार आज संपला असून, आता उद्या (ता. 23) मतमोजणी होईल. राज्यातल्या जनतेचा कौल कोणत्या पक्षाला मिळणार, याची धाकधूक सुरू झाली आहे. दहा महापालिका, 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये यंदा मतदानाचा टक्‍का वाढलेला असल्याने याचा फटका कोणत्या पक्षाला बसणार, याचे आडाखे बांधायला सुरवात झाली आहे. 

राज्यातील दहा महापालिका व 11 जिल्हा परिषदांसाठीचे दुसऱ्या टप्प्यातले मतदान आज पार पडले. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, अकोला, अमरावती व नागपूर या महापालिकांचे मतदान काही अपवाद वगळता शांततेत व उत्साहात पार पडले. 

मुंबई पहिल्यांदाच पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले असल्याने वाढता टक्‍का, कोणाला फटका अशी चर्चा सुरू झाली आहे. 

अत्यंत प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपमध्ये कडवी झुंज असून, विजयाची शृंखला कायम ठेवण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर मुंबई व शिवसेना हे समीकरण या वेळीही कायम ठेवण्यासाठी शिवसेनेच्या अस्मितेची परीक्षा पाहणारी ही निवडणूक असल्याचे मानले जात आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असून, त्यात यश मिळाल्यास त्यांचे नेतृत्व अधिक खंबीर होण्यास मदत होईल. संपूर्ण प्रचारात पारदर्शकता व विकासाचा भाजपने मांडलेला अजेंडा जनतेच्या पसंतीस उतरला की नाही, याचेही मूल्यमापन करणारी ही निवडणूक आहे. मुंबई, ठाणे व नाशिक या महापालिकांत भाजपविरुद्ध शिवसेना असा सरळ सामना आहे, तर पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी कडवी लढत आहे. 

जिल्हा परिषदांमध्ये मात्र भाजपविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस असा बहुतांश जिल्ह्यांत सामना आहे. त्यामुळे भाजपसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 
राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी पुणे व पिंपरी-चिंचवड या महापालिका ताब्यात राखण्याचे आव्हान आहे, तर कॉंग्रेससाठी मात्र सोलापूरवगळता इतर महानगरपालिकांत अस्तित्वाचीच लढाई आहे. 

राज्यातल्या 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यामध्ये सत्ताधारी भाजपसमोर कडवे आव्हान आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनतंर पहिल्यांदाच भाजपसाठी ग्रामीण भागातली लोकप्रियता तपासणारी ही निवडणूक आहे.

राज्यातील महापालिका मतदानाची सरासरी - 56 टक्के

 • मुंबई - 55 टक्के
 • पुणे - 55.5 टक्के
 • पिंपरी-चिंचवड - 67 टक्के
 • ठाणे - 58 टक्के
 • उल्हासनगर - 45 टक्के
 • सोलापूर - 60 टक्के
 • नाशिक - 60 टक्के
 • नागपूर - 53 टक्के
 • अमरावती - 55 टक्के
 • अकोला - 56 टक्के

जिल्हा परिषदनिहाय मतदानाची टक्केवारी -

 • पुणे - 70 टक्के
 • रायगड - 71 टक्के
 • रत्नागिरी - 64 टक्के
 • सिंधुदुर्ग - 70 टक्के
 • नाशिक - 68 टक्के
 • सातारा - 70 टक्के
 • सांगली - 65 टक्के
 • सोलापूर - 68 टक्के
 • कोल्हापूर - 70 टक्के
 • अमरावती - 67 टक्के
 • गडचिरोली - 68 टक्के

 दहा महापालिकांतील सध्याचे बलाबल 

 • मुंबई - शिवसेना-75, कॉंग्रेस- 52, भाजप-31, मनसे-28, राष्ट्रवादी कॉंग्रेस-13 
 • ठाणे - शिवसेना-53, राष्ट्रवादी कॉंग्रेस-34, कॉंग्रेस-18, भाजप-8, मनसे-7 
 • उल्हासनगर - राष्ट्रवादी कॉंग्रेस-20, शिवसेना-19, भाजप-11, कॉंग्रेस-8, मनसे-1 
 • पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस-51, मनसे-29, कॉंग्रेस-28, भाजप-26, शिवसेना-15 
 • पिंपरी-चिंचवड - राष्ट्रवादी कॉंग्रेस-83, कॉंग्रेस-14, शिवसेना-14, मनसे-4, भाजप-3 
 • सोलापूर - कॉंग्रेस-45, भाजप-25, राष्ट्रवादी कॉंग्रेस-16, शिवसेना-8 
 • नाशिक - मनसे-40, राष्ट्रवादी कॉंग्रेस-20, शिवसेना-19, कॉंग्रेस-15, भाजप-14 
 • नागपूर - भाजप-62, कॉंग्रेस-41, राष्ट्रवादी कॉंग्रेस-6, शिवसेना-6, मनसे-2 
 • अमरावती - कॉंग्रेस-25, राष्ट्रवादी कॉंग्रेस-17, शिवसेना-10, भाजप-7 
 • अकोला - भाजप-18, कॉंग्रेस-18, शिवसेना-8, राष्ट्रवादी कॉंग्रेस-5, मनसे-1 

33 जिल्हा परिषदांतील पक्षीय जागांची संख्या 
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 604, कॉंग्रेस - 54, भाजप - 281, शिवसेना - 272, मनसे - 23 

Web Title: municipal corporation, zp election voting in maharashtra