दादा, आम्ही बारामतीत येऊन लढणारच - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

जळगाव - आम्ही बारामतीत येऊन पालिका निवडणूक लढविणारच आहोत, असे प्रत्युत्तर आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. काही दिवसांपूर्वी महाजनांना बारामती येथे येण्याचे आव्हान अजित पवार यांनी दिले होते. येथे आयोजित भाजपच्या शक्ती संमेलनात महाजन बोलत होते.

'मी मागे बारामती पालिका निवडणूक संघटनेच्या बळावर लढण्याचे आव्हान दिले होते. त्यावर पवार यांनी आपल्याला बारामतीला येण्याचे आव्हान दिले आहे, पवार म्हणताहेत तर त्यांना म्हणावं, मी येतोच आहे. आपण संघटनेच्या माध्यमातून बारामती पालिका लढविणार आहोत,'' असे महाजन यांनी सांगितले.

आमदार अनिल गोटेंवर टीका करताना ते म्हणाले की, त्यांनी धुळे महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहेच, परत ते आपल्याला लढण्याचे आव्हान देत आहेत. त्यांनी आता भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांसमोर निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवावे, असे आव्हान महाजनांनी गोटेंना दिले आहे.

सरकार "असंवेदनशील' असल्याच्या शरद पवार यांच्या वक्‍तव्यावर टीका करताना ते म्हणाले, 'त्यांचे सरकार असताना ते कधीही मोर्चाला सामोरे गेले नाहीत. आमच्या काळात आम्ही मोर्चाला सामोरे जाऊन त्यांचे प्रश्‍न सोडवित आहोत. मराठा समाजाला आम्ही न्यायालयात टिकणारे आरक्षण दिलेले आहे. हीच आमची संवेदनशीलता आहे.'

Web Title: Municipal Election Girish Mahajan Ajit Pawar Politics