धुळ्यात कमळ, नगरमध्ये भगवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

धुळे/नगर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या धुळे आणि नगर महानगरपालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला.

धुळे/नगर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या धुळे आणि नगर महानगरपालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात लढलेल्या भाजपने "फिप्टी प्लस'चा नारा खरा ठरविला. भाजपला 74 जागांपैकी 50 जागांवर विजय मिळाला. भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तसेच कॉंगेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला 14 जागांवर समाधान मानावे लागले. गोटे यांच्या बंडखोरीमुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध आमदार गोटे अशी झाली होती. मात्र, गोटे यांच्या पत्नी हेमा याच केवळ निवडून आल्या, तर पुत्र तेजससह इतर सर्व उमेदवार पडले. "एमआयएम' या पक्षाने दोन जागा जिंकत धुळ्यात खाते उघडले. भाजपने ईव्हीएममध्ये गैरप्रकार करत आणि गुंडगिरीच्या जोरावर निवडणूक जिंकल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे.

धुळ्यात भाजपला यश मिळाले तरी नगरमध्ये मात्र एकहाती सत्ता मिळवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. येथील महापालिका निवडणुकीत एकूण 68 जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक 24 जागा जिंकत सर्वांत मोठ्या पक्षाचा मान मिळविला. त्यांच्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने 18 जागा, तर भाजपने 14 जागा जिंकल्या. कॉंग्रेसला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने नगर महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर महापालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर बनणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलेला आमदार श्रीपाद छिंदम या निवडणुकीत विजयी झाल्याने सर्वच जण आश्‍चर्यचकीत झाले आहेत. ते जवळपास दोन हजार मतांनी विजयी झाले. नगरमध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढले, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. या आघाडीला 23 जागा मिळाल्या आहेत. अपक्ष आणि इतरांना हाताशी धरून ते महापौरपदावर दावा करू शकतात. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास आघाडीपासून सत्ता दूरच राहील.

अनिल गोटेंनी अतिशय खालच्या पातळीवरून भाजप नेत्यांवर आणि मंत्र्यांवर टीका केली. पक्षापेक्षा आपण मोठे असल्याचे दाखवण्याचा गोटेंचा प्रयत्न होता. पण जनतेने त्यांना निवडणुकीत योग्य जागा दाखवली.
- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

धुळे निकाल
- भाजप - 50
- शिवसेना - 2
- राष्ट्रवादी - 9
- कॉंग्रेस - 5
- एमआयएम - 2
- समाजवादी पार्टी - 2
- बसपा - 1
- लोकसंग्राम पक्ष - 1
- अपक्ष - 2

नगर निकाल
- भाजप - 14
- शिवसेना - 22
- राष्ट्रवादी - 20
- कॉंग्रेस - 4
- समाजवादी पार्टी - 1
- बसपा - 4
- अपक्ष -3

Web Title: Municipal Election Result BJP Shivsena Politics