सत्तेची चावी शिवसेनेकडे, बहुमताची शक्‍यता कमी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पोलिस गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर भाजप गोटात अस्वस्थता
- महेश पांचाळ

पोलिस गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर भाजप गोटात अस्वस्थता
- महेश पांचाळ
मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्तेच्या खुर्चीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये तुल्यबळ जागा मिळण्याचा अंदाज खासगी वाहिन्यांच्या एक्‍झिट पोलकडून वर्तवण्यात आला असला, तरी मुंबई पोलिस खात्याच्या अहवालात मुंबईतील 227 जागांपैकी शिवसेनेच्या पदरात 95 ते 105 जागा पडण्याची शक्‍यता आहे. दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या भाजपला 55 ते 65 जागा मिळण्याची शक्‍यता आहे. मुंबईत बहुमतासाठी 114 चा आकडा गाठता आला नाही तरीही शिवसेनेकडे सत्तेच्या चाव्या असतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

मतदान संपल्यानंतर खासगी वाहिन्यांकडून एक्‍झिट पोलचे आकडे जाहीर करण्यात आले. त्यांत साधारणतः शिवसेना ही 80 ते 90 जागांवर राहणार असून, त्याखालोखाल भाजप 70 ते 80 जागांवर राहील, असा अंदाज बांधला होता. एक्‍झिट पोलनुसार, खासगी वाहिन्यांवर चर्चेची गणिते मांडली जात होती. त्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेसाठीही तुल्यबळ लढत होईल, असे चित्र निर्माण केले गेले होते. या पार्श्‍वभूमीवर 23 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार असले, तरी राज्य आणि मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा अहवाल काय आहे याची राज्यकर्त्यांनाही उत्कंठा लागलेली असते. हा अहवाल गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचला असून, मुंबईत भाजप एक पाऊल मागे असल्याने पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत 2012 च्या महापालिका निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले होते. 2017 च्या निवडणुकीत 55 टक्के मतदान झाले. हा वाढीव टक्का भाजपच्या बाजूने जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर 227 शाखांचे नेटवर्क असलेल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांपासून शाखाप्रमुखांपर्यंत स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे दिसून आले होते. गुजराती आणि उत्तर भारतीय मतांवर भाजपची मोठी मदार आहे. त्यामुळे हा वाढलेला टक्का कोणत्या मतदारसंघात आहे, यावर बहुतांशी निकाल अवलंबून आहे. सत्तेचा दावा करणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये 55 ते 60 जागांमध्ये थेट चुरस असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या चुरशीमध्ये कोण जिंकतो, यावर शिवसेना आणि भाजपच्या जागांमधील दरी कमी- जास्त होण्याची शक्‍यता आहे.

किंगमेकर कोण होणार?
गुप्तचर विभागाच्या म्हणण्यानुसार, कॉंग्रेसला 25 ते 30 जागा, राष्ट्रवादीला 9 ते 11 जागा, मनसेला 7 ते 10 जागा, सप 4 ते 6 जागा, एमआयएम 2 ते 3 जागा, तर अपक्ष 10 ते 12 निवडून येण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसचा पाठिंबा घेणे हे शिवसेनेला राजकीयदृष्ट्या परवडणारे नसल्याने मनसेला सोबत घेतले जाऊ शकते, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. उद्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तटस्थ राहण्याची भूमिका घेतली जाऊ शकते. या निवडणुकीत एमआयएमचा प्रभाव वाढेल असे वाटत होते; परंतु मुंबईत दोन आकडी संख्या गाठणे एमआयएमला अशक्‍य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: municipal key to shivsena