मुंबईसह राज्यभरात उत्साहात मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग

दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग
मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मताधिकार बजावला. राज्यातील महानगरपालिकांसाठी दुपारी दीडपर्यंत 31.01 टक्के मतदान झाले होते.

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस व मातु:श्री सरिता फडणवीस यांच्यासह मताधिकाराचा हक्क बजावला.
मुंबई महानगरात सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 227 जागांसाठी दोन हजार 275 उमेदवार लढत देत आहेत. याशिवाय नागपूर, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती या महानगरपालिकांमध्येही आज मतदान झाले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, गडचिरोली या जिल्हा परिषदा तसेच वर्धा, यवतमाळ याठिकाणच्या काही जागांसाठीही आज मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 167 उमेदवारांमध्ये लढत होती.

मुंबईमध्ये आज सकाळीच राजकीय दिग्गजांनी मताधिकार बजावला. शिक्षण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आपली नात रेवती सुळे हिच्यासह मतदान केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्‍मी ठाकरे, आदित्य ठाकरे, ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, खासदार पूनम महाजन, खासदार रामदास आठवले, सीमा आठवले, सचिन अहिर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, पोलिस सहआयुक्त देवेन भारती यांनीही मतदान केले.

याशिवाय अभिनेत्री व खासदार रेखा, अभिनेते सुनील बर्वे, रणबीर सिंग, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सोनम कपूर, मान्यता दत्त, श्रद्धा कपूर, अनुष्का शर्मा, हेमामालिनी, सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, उद्योजक टीना अंबानी, क्रिकेटपटू संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, डॉ. अंजली तेंडुलकर यांनी सकाळीच मताधिकार बजावला. या वेळी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पुण्यात अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, अकोल्यात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, अमरावतीमध्ये उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, सोलापूरमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

- देवेंद्र फडणवीस - जनता नक्‍कीच आम्हाला मतदान करेल
- उद्धव ठाकरे- मतदारांना धन्यवाद, शिवसेना जिंकणार
- आदित्य ठाकरे - मुंबईसाठी चांगले मतदान
- रश्‍मी ठाकरे- मतदारांचा प्रतिसाद छान आहे
- राज ठाकरे - मतदारांनी हक्‍क बजावला तसेच राजकीय पक्षांनी कामांचा हक्‍क बजावला पाहिजे, टक्‍का घसरणे म्हणजे राजकीय पक्षांनी कामे न केल्याचे द्योतक आहे
- अजित पवार - निवडणुकीनंतर शिवसेनेची "बार्गेनिंग पॉवर' वाढेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal & zp election in maharashtra