महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 2017 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मुंबई -  राज्यातील दहा महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीवर 12 ते 17 जानेवारी 2017 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, तर अंतिम मतदार यादी 21 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. 

मुंबई -  राज्यातील दहा महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीवर 12 ते 17 जानेवारी 2017 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, तर अंतिम मतदार यादी 21 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. 

सहारिया म्हणाले, ""केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 1 जानेवारी 2017 च्या अर्हता दिनांकावर आधारित तयार करण्यात येणारी विधानसभा मतदारसंघाचीच मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी महानगरपालिकांसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदांसाठी निवडणूक विभागनिहाय; तर पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभागण्यात येईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 सप्टेंबर 2016 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीचे विभाजन 15 डिसेंबर 2016 पर्यंत करण्यात येईल. त्यानंतर ती मतदार यादी संबंधित महानगरपालिका, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळांवर सर्वांच्या माहितीस्तव प्रसिद्ध केली जाईल. 
 

नवीन मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकानुसार 16 सप्टेंबर ते 21 ऑक्‍टोबर 2016 या कालावधीत नवीन मतदार नोंदणी; तसेच नाव व पत्त्यांतीतील दुरुस्तीसाठी अर्ज मागविले होते. या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊन भारत निवडणूक आयोग 5 जानेवारी 2017 रोजी विधानसभा मतदारसंघांची पुरवणी यादी प्रसिद्ध करणार आहे. या पुरवणी यादीचेही महानगरपालिकांसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदांसाठी निवडणूक विभागनिहाय; तर पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभाजन करून ती 12 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केली जाईल. 21 जानेवारी 2017 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. 

निवडणुका होणाऱ्या 10 महानगरपालिकांची नावे अशी : 1) बृहन्मुंबई, 2) ठाणे, 3) उल्हासनगर, 4) नाशिक, 5) पुणे, 6) पिंपरी-चिंचवड, 7) सोलापूर, 8) अमरावती, 9) अकोला आणि 10) नागपूर. 
 

निवडणुका होणाऱ्या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांची संख्या : 1) रायगड- 15, 2) रत्नागिरी-9, 3) सिंधुदुर्ग- 8, 4) नाशिक- 15, 5) जळगाव- 15, 6) नगर- 14, 7) पुणे- 13, 8) सातारा- 11, 9) सांगली- 10, 10) सोलापूर- 11, 11) कोल्हापूर- 12, 12) औरंगाबाद- 9, 13) जालना- 8, 14) परभणी- 9, 15) हिंगोली- 5, 16) बीड- 11, 17) नांदेड- 16, 18) उस्मानाबाद- 8, 19) लातूर- 10, 20) अमरावती- 10, 21) बुलडाणा- 13, 22) यवतमाळ- 16, 23) नागपूर- 13, 24) वर्धा- 8, 25) चंद्रपूर- 15 आणि 26) गडचिरोली- 12. एकूण जिल्हा परिषदा- 26 व एकूण पंचायत समित्या- 296. 

Web Title: municipal zp,panchayat election 2017