कर्नाटक पोलिसांचा 'सनातन'भोवती फास

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले
मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे महाराष्ट्रातील "सनातन' संस्थेशी जुळू लागल्याने कर्नाटक पोलिसांनी सनातन संस्थेभोवती फास आवळण्यास सुरवात केल्यानेच महाराष्ट्र पोलिसांवर "सनातन'वर कारवाई करणे भाग पडले आहे.

प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे जुळू लागले
मुंबई - प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे महाराष्ट्रातील "सनातन' संस्थेशी जुळू लागल्याने कर्नाटक पोलिसांनी सनातन संस्थेभोवती फास आवळण्यास सुरवात केल्यानेच महाराष्ट्र पोलिसांवर "सनातन'वर कारवाई करणे भाग पडले आहे.

राज्यात भाजपचे सरकार असतानाही सनातनच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे घालण्याचे धाडस पोलिसांना दाखवावे लागले असले, तरी सनातनवर बंदीची कोणतीही शक्‍यता नसल्याचे समजते. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाकडे 2011 मध्ये पाठवलेल्या सनातनवरील बंदीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी पत्र पाठवले जाणार आहे. अशा प्रकारे यापूर्वी चार वेळा पाठपुराव्यासाठी पत्रे पाठवण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील "सनातन'च्या काही संशयास्पद कार्यकर्त्यांवर कर्नाटक पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे संकेत राज्य पोलिसांना मिळाले होते. सनातनच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली असती, तर राज्य पोलिसांवर नामुष्की ओढावली असती; तसेच या कार्यकर्त्यांना अटक करून सनातनसंदर्भातील महत्त्वाचे पुरावे राज्य सरकारने कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात जाऊ न देण्याची चलाखीही दाखवल्याचे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

या दबावातूनच राज्य पोलिसांनी सनतानविरोधात मोहीम उघडली असली तरी प्रत्यक्षात सनातनवर बंदी आणणे किंवा या संस्थेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाईची शक्‍यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नालासोपाऱ्यात वैभव राऊत याच्या घरी स्फोटके व पिस्तुले सापडली आहेत. गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास कर्नाटक पोलिसांकडून जलद आणि अचूक सुरू असल्याचे मानले जात आहे. सनातनविरोधात कर्नाटक पोलिसांकडे भक्‍कम पुरावे जमा झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Murder case Karnataka Police Sanatan Sanstha