संगीतप्रेमींनी विश्वशांतीचे दूत व्हावे!

मोदींचे आवाहन; ‘लता दीनानाथ मंगेशकर’पुरस्कार स्वीकारला
Prime Minister Narendra Modi appeal Accepted Lata Dinanath Mangeshkar Award
Prime Minister Narendra Modi appeal Accepted Lata Dinanath Mangeshkar Award sakal

मुंबई : ‘वसुधैव कुटुम्बकम’अर्थात सर्वविश्वाच्या विकासासाठी योग, आयुर्वेद, पर्यावरण रक्षणाद्वारे भारत जगाला दिशा देत आहे. भारतीय संगीत हा त्याचाच एक भाग असून त्याच्या साह्याने विश्वशांतीचे दूत होणे ही आपली जबाबदारी आहे. ती स्वीकारून संगीतप्रेमी नवा भारत निर्माण करतील, अशी खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केली. हा पुरस्कार त्यांनी देशवासीयांना अर्पण केला.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते. आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आदी मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते मोदी यांना मुंबईतील षखण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार देण्यात आला. मोदी यांनी यावेळी लतादीदींची महती तर सांगितलीच, पण संगीतातील ताकदीचेही यथार्थ वर्णन केले. आपण शांत बसलो असता संगीत आपल्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आपल्याला वैराग्याची अनुभूती देऊ शकते.

आपल्यात वीररस संचारू शकतो. ममता, राष्ट्रभक्ती, कर्तव्यबोध यांच्या शिखरावर नेऊ शकते. संगीतातील या शक्तीला आपण लतादीदींच्या रुपाने पाहिले हे आपले भाग्य आहे. लतादीदी या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांनी मला अपार प्रेम दिले. कोणीही वयाने मोठा होत नाही, तर तो त्याच्या कामाने आणि देशासाठी जे करतो त्यातूनच तो मोठा होतो, असे लतादीदी नेहमी म्हणत. अशा विचारांनीच त्या व्यक्तीची महानता कळते, असेही मोदी यांनी आदरपूर्वक सांगितले.

कमतरतांची नोंद

पंतप्रधान मोदींना यावेळी सन्मानपत्र देण्यात आले. ‘आपल्यावर स्तुतीसुमने उधळणारे हे सन्मानपत्र खूप वेळा वाचावे लागेल, त्यातील टिपणे काढून त्यात आपल्याबद्दल जी कमतरता नोंदवली आहे, ते जाणून त्या पूर्ण कशा करायच्या याची मला जाणीव ठेवावी लागेल; मात्र लतादीदींच्या आशीर्वादाने या कमतरता पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आपण सामान्यतः असे पुरस्कार स्वीकारत नाही; मात्र मोठ्या बहिणीच्या नावे मला दिला जाणारा पुरस्कार हे लतादीदींचे आपलेपण आणि मंगेशकर कुटुंबियांचा माझ्यावर हक्क असल्यामुळे हा पुरस्कार स्वीकारणे, ही माझी जबाबदारी होती, असे मोदी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले ‘हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’, हे छत्रपती शिवरायांवरील गीतही लतादीदीने आपल्या स्वरांनी अजरामर केले, असे भावोद्गारही त्यांनी काढले. गायक सुधीर फडके यांनी प्रथम लतादीदींची ओळख आपल्याला करून दिली होती, अशी आठवणही मोदींनी सांगितली.

पंडित हृदयनाथ मंगेशकर तब्येत बरी नसल्याने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. आशा भोसले यांनी लतादीदींच्या काही आठवणी सांगितल्या. उषा मंगेशकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन आदिनाथ मंगेशकर आणि हरीश भिमानी यांनी केले.

इतर पुरस्कारांचे वितरण

संगीत, नाटक, कला आदी क्षेत्रातील पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. संगीत क्षेत्रातील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना, चित्रपट सेवेसाठीचे विशेष मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांना, मास्टर दीनानाथ मंगेशकर आनंदमयी हा सेवा पुरस्कार मुंबईचे डबेवाले यांना आणि सर्वोत्कृष्ट नाटकासाठी पुरस्कार ''संज्या छाया'' नाटकास यावेळी देण्यात आला.

घोषणांनी सभागृह दमदमले

पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर, ‘मोदी-मोदी’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. या समारंभासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योग मंत्री सुभाष देसाई, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी मान्यवर हजर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com