"नाफेड'ने तूर खरेदी केंद्रे सुरू करावीत 

"नाफेड'ने तूर खरेदी केंद्रे सुरू करावीत 

सोलापूर - राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. नाफेडच्यावतीने सुरू करण्यात आलेली तूर खरेदी केंद्रे 22 एप्रिलपासून बंद करण्यात आली आहेत, ती पुन्हा सुरू करावीत व 31 मे पर्यंत सुरू ठेवावीत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी बुधवारी (ता. 3) पत्र देऊन ही विनंती केली आहे. 

राज्यात 2016-17 च्या खरीप हंगामामध्ये तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. उत्पादन जास्त झाल्यामुळे तुरीचे बाजारभाव खूपच कोसळले आहेत. हमीभावापेक्षाही त्याचे भाव कमी झाले आहेत. सध्या बाजारात तीन हजार 800 ते चार हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने तुरीची खरेदी सुरू आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात तूर खरेदी केंद्रे 22 एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. त्या कालावधीत चार लाख 15 हजार टन तुरीची खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय जवळपास एक लाख टन तूर अद्यापही खरेदी केंद्रांवर पडून आहे. 

सरकार तूर खरेदी करेल या आशेवर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तूर आणली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये हमीभावाने सर्व तूर खरेदी करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यातच तूर उत्पादक क्षेत्रातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. हमीभावाने तूर खरेदी करावी, अशी त्यांची मागणी आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने डाळींच्या साठ्यामध्ये वाढ करण्यास सांगितले आहे, जेणेकरून तुरीचे ढासळलेले भाव स्थिर राहण्यास मदत होईल, असाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी पत्रामध्ये केला आहे. राज्यातील तुरीची ही स्थिती पाहता आपण "नाफेड'ला पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली आहे. 

शेतकऱ्यांना मिळेल दिलासा 
"नाफेड'ने तूर खरेदी केंद्रे 31 मे पर्यंत सुरू ठेवावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली आहे. मागणी कृषिमंत्र्यांनी मान्य केल्यास राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली तूर विकलेली नाही, त्या शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विकणे सोपे जाणार आहे. मात्र, याबाबत केंद्र काय भूमिका घेते, याकडे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com