महिलेस विवस्त्र करून मारहाण: पोलिसांची भूमिका संशयास्पद

बुधवार, 26 सप्टेंबर 2018

नगर : श्रीगोंदे तालुक्यातील भाणगाव येथे महिलेला विवस्त्र करून मारहाण झाली असल्याचा व्हिडिओ असूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. संबंधित महिलेचे कुटुंब तक्रार न दाखल करता निघून गेल्याचा स्थानिक पोलिसांचा दावा आहे; मात्र संबंधित महिलेच्या कुटुंबावरची तक्रार पोलिसांनी आधी दाखल करून घेतली असल्याचे दिसते आहे. 

नगर : श्रीगोंदे तालुक्यातील भाणगाव येथे महिलेला विवस्त्र करून मारहाण झाली असल्याचा व्हिडिओ असूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. संबंधित महिलेचे कुटुंब तक्रार न दाखल करता निघून गेल्याचा स्थानिक पोलिसांचा दावा आहे; मात्र संबंधित महिलेच्या कुटुंबावरची तक्रार पोलिसांनी आधी दाखल करून घेतली असल्याचे दिसते आहे. 

शेतात शेळी घुसल्याच्या कारणावरुन अनुसूचीत जमातीतील महिला आणि तिच्या पतीला 12 सप्टेंबरला चार ते पाच जणांकडून मारहाण करण्यात आली. मारहाण केल्याचा आरोप असलेल्या वाघस्कर यांची तक्रार घटनेच्या दिवशीच पोलिसांकडे दाखल आहे; तर आदिवासी महिलेची तक्रार तीन दिवसांनंतर (ता. 14 सप्टेंबर) दाखल करुन घेण्यात आली.

यासंदर्भात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांच्यावतीने 'आमच्याकडे गुन्हा दाखल करायचा नाही, असे सांगून महिला आणि तिचे कुटुंब निघून गेले,' असा दावा करण्यात येत आहे. 
Image may contain: 1 person, sitting

श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार म्हणाले, " घटनेनंतर दोन्ही बाजूचे लोक तक्रार देण्यासाठी आलो होते. त्यापैकी एका गटाची तक्रार नोंदवून घेण्याचे काम सुरु असताना 'तुम्ही यांची तक्रार घेत असाल तर आम्हाला येथे तक्रार द्यायची नाही,' असे सांगून संबंधित महिला आणि तिचे पती निघून गेले. या महिलेने पोलिसांकडे दुसऱ्या दिवशी अर्ज आणुन दिला. आम्ही गुन्हा नोंदवून घेण्यासाठी बोलावले असता त्या आल्या नाहीत. मोठ्या अधिकाऱयांकडे गेलो की मोठा गुन्हा दाखल होतो असा समज असल्याने त्या वरिष्ठांकडे गेल्या."

घटना काय होती?
संबंधित कुटूंब गेल्या 15-20 वर्षांपासून भाणगाव येथे राहत आहे. 12 सप्टेंबरला दुपारी तीनच्या सुमारास त्यांची शेळी शेतात घूसली या कारणाने गावातील वाघस्कर कुटुंबांतील पुरूषांनी या आदिवासी कुटुंबातील पुरूषाला मारहाण सुरू केली. पतीला वाचवायला गेलेल्या महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. या दोघांकडून मदतीची याचना करण्यात येत होती; मात्र त्यांना कोणीही मदत केली नाही.

पोलिसांकडून टाळाटाळ
'घटनेच्या दिवशी संध्याकाळी श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे गेलो होतो. मात्र तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली,' असा मारहाण झालेल्या कुटुंबाचा आरोप आहे. 'पोलिसांकडे गेले असता त्यांनी तुम्ही खोटी केस करता, तुम्ही इथुन जा, असे मला सांगितले,' असा आरोप संबंधित महिलेने केला आहे. 

संबंधित महिला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत गेल्यानंतर घटनेनंतर तीन दिवसांनी तक्रार दाखल करुन घेतली गेली. तक्रार दाखल करुन घेतल्यानंतरही आरोपींना बोलावण्यात आले नाही. तसेच आरोपींना जामीनही मिळाला. 

तुमच्यावर अन्याय झालाच नाही असे पोलिस सांगतात
संबंधित महिला म्हणाली, ''घटनेनंतर पोलिसांनी तीन दिवस तक्रार नोंदवून घेतली नाही. तुम्ही खोटी तक्रार दाखल करत आहात, तुमच्यावर अन्याय झालाच नाही असे पोलिस म्हणत होते...गुन्हा मागे घेण्यासाठी आम्हाला धमकावलं जात आहे. आमचा मुलगा दुसरीला आहे. त्याच्यासमोर मला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. घटनेनंतर मुलगा शाळेत जातो तेव्हा त्यालाही चाकू दाखवून धमकावलं जात आहे.'

'आम्ही 15-20 वर्षांपासून गावात राहतो. स्वतःची तीन साडेतीन एकर शेती आहे. आमच्याकडं शेळ्या नाहीत. आम्ही कष्ट करुन खातो. आमचं कोणी नाही म्हणुन अशाप्रकारे मारहाण झाली. मला न्याय मिळाला नाही तर मी पोलिसांसमोर विष पिऊन आत्महत्या करेन,' असा इशारा संबंधित महिलेने दिला आहे.

संबंधित बातम्या :
कायद्याचा धाक राखण्यात सरकारला अपयश : सुप्रिया सुळे
नगर पोलिसांनी आता कारवाई करावी : नीलम गोऱ्हे​
महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना धक्कादायक : चित्रा वाघ

Web Title: Nagar Incident police role doubtful