पीडित मुलीवर अत्याचार करून खून केल्याचे स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला आज विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरवात झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. पीडित मुलीचा मृत्यू अनैसर्गिक असून, तसे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याचे सांगून परिस्थितीजन्य पुरावे, कायदा आणि तर्कशास्त्रानुसार आरोपींनी कट रचल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी न्यायालयास सांगितले. आरोपींविरोधात सरकार पक्षाने 24 मुद्दे सिद्ध केले असून, पीडित मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हणणे मांडले. त्यासाठी न्यायवैद्यक अहवालांचे दाखले दिले.

आरोपी शिंदेला घटनास्थळावरून पळून जाताना साक्षीदारांनी पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. आरोपी संतोष भवाळ, नितीन भैलुमे घटनास्थळी नसले, तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्यांचे गुन्ह्यात संगनमत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगत ऍड. निकम यांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान मांडलेल्या पुराव्यांचा उल्लेख केला. घटनेच्या आधी पीडित मुलीची छेडछाड करताना तिन्ही आरोपी सोबत होते आणि त्याआधी जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुमेचा फोन झाल्याचा पुरावा सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. तिन्ही आरोपींनी कट करून अत्याचार व खून केला. याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळणे कठीण आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा विचार करता निष्कर्ष व अनुमानावरून ते स्पष्ट होते, असे सांगत ऍड. निकम यांनी मुंबई बॉंबस्फोट खटल्याच्या निवाड्याचा दाखला दिला.

आरोपीचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. योहान मकासरे, ऍड. प्रकाश आहेर उपस्थित होते.

युक्तिवादाचे ध्वनिमुद्रण
'न्यायालयाने आज अंतिम युक्‍तिवादाचे ध्वनिमुद्रण केले. हे ध्वनिमुद्रण सीडी अथवा पेन ड्राइव्हमध्ये टाकून दोन्ही पक्षांच्या वकिलांना देण्यात येणार आहे. अंतिम युक्तिवादाच्या ध्वनिमुद्रणाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. असे ध्वनिमुद्रण विदेशात केले जाते,'' असे ऍड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

Web Title: nagar news kopardi rape case result