राज्यातील पाच स्थळांना मिळणार जैवविविधता वारसाचा दर्जा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

वडधरा जीवाश्‍म, वेळास, आंजर्ला, मेहरुण, दलदल कुहीचा समावेश

वडधरा जीवाश्‍म, वेळास, आंजर्ला, मेहरुण, दलदल कुहीचा समावेश
नागपूर - राज्यातील पाच स्थळांना जैवविविधता वारसाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावावर आजच्या जैवविविधता मंडळाच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. यामध्ये कासवांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेले वेळास व आंजर्ला (जि. रत्नागिरी), तर स्थलांतरित पक्षांचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे मेहरुण व लांडोरखोरी तलाव (जि. जळगाव), सालेकसा वनपरिक्षेत्रातील दलदल कुही आणि बंजारी (जि. गोंदिया), वडधाम जीवाश्‍म स्थळ (जि. गडचिरोली) या पाच स्थळांचा समावेश आहे.

या स्थळांना जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यापूर्वी प्रस्तावातील काही त्रुटी दूर करणे आणि ग्रामसभेच्या मंजुरी गरजेची असल्याने या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्रुटी दूर केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय स्वयंसेवी संस्थांच्या थकलेल्या 40 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती विश्‍वासनीय सूत्रांनी दिली. या पाच ठिकाणांना जैवविविधता वारसा स्थळ जाहीर करणार असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रकाशित केले होते.

लोकसहभागातून स्थानिक जैविक विविधतेचे संरक्षण व संवर्धन व पारंपरिक गोष्टींचे जतन करण्यासाठी जैवविविधता कायदा 2002 कायद्यान्वये संबंधित ठिकाण "जैवविविधता वारसास्थळ' जाहीर केले जाते. वारसास्थळ होण्यासाठी संबंधित गावच्या ग्रामसभेत ठराव मंजूर करावा लागतो. यापूर्वी गडचिरोलीतील सागवानाच्या भव्य वृक्षांकरिता प्रसिद्ध असलेल्या ग्लोरी ऑफ आलापल्लीला "जैविक वारसा क्षेत्र' म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे.

Web Title: nagpur maharashtra news five place biodiversity calf status