राज्यात बिबट, वाघांच्या मृत्यूचा आलेख उंचावला

Tiger
Tiger

नागपूर - राज्यात वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गातील मानवी अडथळे आणि कॉरिडॉरचे निकष डावलले गेल्याने गेल्या दोन वर्षांत आठ बिबट आणि तीन वाघांसह शेकडो वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गच नव्हे, तर अभयारण्यातील बफर क्षेत्रालगतचे रस्ते दिवसेंदिवस वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. 

विदर्भात सर्वाधिक वन्यप्राणी, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या बफर आणि कॉरिडॉरमधून रस्त्यांचे जाळे विणले आहे. पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत या परिसरात रस्ते अपघातात मरण पावणाऱ्या वन्यप्राण्यांची संख्य अल्प आहे. 

या भागात नागरिकांमध्ये असलेल्या जनजागृतीचा हा फायदा असल्याचे बोलले जात आहे. विदर्भ वगळता इतरत्र वन्यप्राण्यांची संख्या कमी असतानाही त्या भागातच रस्ते अपघातात अधिक वन्यप्राण्यांचा जीव जात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 

त्या परिसरातील मार्गावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांनी वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. राष्ट्रीय महामार्ग हे निमित्तमात्र असले तरीही बफरलगत वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंची मालिका मोठी आहे.

बफरलगतच्या रस्त्यांवर ‘स्पीड ब्रेकर’ व बफरमधील गावात जाण्याकरिता वनखात्याच्या चौक्‍या आवश्‍यक आहेत. मात्र, या आवश्‍यक बाबींकडेच वनखात्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. जानेवारी ते मार्च २०१७ मध्ये पाच बिबट, दोन वाघ, २०१८ मध्ये तीन बिबट, एका वाघाचा मृत्यू झाला. 

रात्रीच्या वेळेसच वन्यप्राण्यांचे अपघात अधिक होतात. कारण, रात्री वाहनचालक भरधाव वाहने दामटवतात. वन्यप्राण्यांचे अनेक अपघाती मृत्यू रात्रीच झालेले आहेत. हा वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग आहे. या मार्गावरून वाहनांची गती कमी ठेवावी, अशा आशयाचे फलक दरम्यानच्या काळात लावण्यात आले. मात्र, ते किती वाहनचालक वाचतात आणि अंमलबजावणी करतात, याविषयी शंकाच आहे. 

रात्रीच्या वेळेची असलेली मर्यादा कोणताही वाहनचालक पाळताना दिसत नाही. वनखात्याची उपाययोजना केवळ जंगलापुरती असते. मात्र, बफरलगतच्या रस्त्यांवरून रात्री होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध लावण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना वनखाते किंवा शासनाकडून घेतली गेलेली नाही.

जंगलालगतच वन्यप्राण्यांची ही अवस्था आहे, तर शहरात येणाऱ्या वन्यप्राण्यांची सुरक्षितता कुणाच्या भरवशावर, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट अपघातात मृत्यू पडत आहेत. त्यामुळे वाहनांच्या या वाढलेल्या गतीवरही नियंत्रण आणण्याची गरज आता भासू लागली आहे.

कॉरिडॉरचे निकष
विभागीय कॉरिडॉर         ५०० मीटर रुंद
उपविभागीय कॉरिडॉर     ३०० मीटर रुंद
स्थानिक कॉरिडॉर         ५० मीटर रुंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com