परराज्यात लपणारे आरोपी टार्गेटवर! 

परराज्यात लपणारे आरोपी टार्गेटवर! 

नागपूर - महाराष्ट्रात गुन्हे केल्यानंतर शेजारील राज्यात आरोपी लपून बसतात. पोलिसांनी त्या आरोपींचा शोध घेणे कठीण होते. त्यामुळे परराज्यातील पोलिस विभागातही समन्वय आवश्‍यक असल्याची बाब हेरून सोमवारी राज्यस्तरीय गुन्हे समन्वयक परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील अधीक्षक स्तरीय अधिकाऱ्यांसह झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यातील 22 वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती पोलिस सहआयुक्‍त शिवाजी बोडखे यांनी आज आयुक्‍तालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

राज्यात घडणाऱ्या अवघड स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे राज्या-राज्यात समन्वय साधून गुन्हेगारांच्या माहितीची देवाण-घेवाण करून गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणे तसचे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. 28) नागपुरातील पटेल बंगला, छावणी येथील एन-कॉप्स सेंटरमध्ये परिषद आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये अतिरिक्‍त पोलिस महासंचालक ते पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. अशा स्वरूपाची परिषद नागपूर पोलिसांनी पहिल्यांदाच आयोजित केली आहे. मध्य प्रदेशातील अतिरिक्‍त पोलिस महासंचालक (सीआयडी) कैलास मकवाना, छत्तसगडमधील दुर्ग परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिपांशू काबरा, छिंदवाडा येथील जी. के. पाठक, बालाघाटचे पोलिस उपमहानिरीक्षक इरशाद अली, एम. एल. कोटवानी, राजनांदगाव येथील जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत अग्रवाल, कंवर्धा येथील अधीक्षक लाल उमेदसिंग हे सहभागी होणार आहेत. तसेच नागपूरसह अमरावती परिक्षेत्र, अमरावती शहर, नक्षल विरोधी अभियान, गडचिरोली परिक्षेत्र, नागपूर रेल्वे येथील अधीक्षक स्तरीय अधिकारीसुद्धा सहभागी होणार आहे. नागपूर शहराचा विकास आणि विस्तार झपाट्याने होत आहे. नागपुरात नोकरी किंवा मजुरी करण्यासाठी स्थानांतरण करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे गुन्हेगारीसुद्धा वाढत आहे. नागपुरात गुन्हा केल्यानंतर लगेच शेजारच्या राज्यात जाऊन आसरा घेणाऱ्या आरोपींची संख्या मोठी आहे. तेथील पोलिसांशी योग्य समन्वय आणि संपर्क नसल्यामुळे अनेक गुन्हे आरोपी मिळून न आल्यामुळे प्रलंबित आहेत. नक्षलवाद्यांशी दोन-दोन हात करण्यासाठी आणि सायबर क्राइमची प्रकरणे हाताळण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी पालिस उपायुक्‍त संभाजी कदम आणि सहायक पोलिस आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे उपस्थित होते. 

माहितीची होणार आदान-प्रदान 
आतापर्यंत उघडकीस न आलेले खून, दरोडे, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरी इत्यादींसह पकड वॉरंट, फरार आरोपी, मिसिंग व्यक्‍ती आणि ओळख न पटलेले मृतदेह याबाबत माहितीचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे, असेही सहआयुक्‍त बोडखे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com