आतातरी राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करा - एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

नागपूर - राज्यातील अवर्षणग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वपक्षाला घरचा आहेर दिला. सरकार आतातरी राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करणार आहे का? डिसेंबर उलटून जानेवारी महिना आला तरी सरकारने दुष्काळी गावांबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. सर्वेक्षण होऊन चार-सहा महिने उलटतात तरी दुष्काळ जाहीर केला जात नाही. या काळात लोकांनी मरायचे का? सरकार त्या दृष्टीने कोणतीही व्यवस्थादेखील करत नाही, असे म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सरकारला सुनावले.

या वेळी दुष्काळी क्षेत्र जाहीर करण्यासंबंधी केंद्र सरकारचे निकष पाळायचे ठरवले तर राज्यातील एकही गाव पात्र ठरणार नाही, अशा शब्दांत खडसेंनी सरकारला सुनावले. केंद्र सरकारने दुष्काळी क्षेत्र ठरवण्यासाठी आखून दिलेले नवे निकष हे कठोर आणि वेगळे आहेत, ही बाब आम्हाला मान्य आहे. मात्र, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकही गाव निकषांमध्ये बसणार नाही, ही बाब तितकीशी खरी नाही. खडसेंच्या या प्रश्नाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की आतापर्यंत गोंदियातील तीन गावांना याच निकषांनुसार दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यानिमित्ताने एकनाथ खडसे पुन्हा एकदा आपल्याच सरकारचे वाभाडे काढताना दिसले. दुष्काळ घोषित करण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. त्यात बदल करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत दिल्लीला जाऊन प्रयत्न करण्यात येतील.

मुक्ताईनगर, बोधवड व अंमळनेर तालुक्‍यातील गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत असल्यास जुन्या निकषाप्रमाणे राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

Web Title: nagpur news eknath khadse talking