"नमामि' नव्हे, "क्षमामि' चंद्रभागा अभियान! 

रजनीश जोशी
रविवार, 1 जुलै 2018

महसूल विभागाने नदीकाठी वृक्षारोपण करण्याची जागा निश्‍चित करणे, त्याला वनविभागाची साथ मिळणे आणि काठावरील शेतकऱ्यांचे सहकार्य मिळणे या परस्परविरोधी गोष्टी असल्याचे ध्यानात येत आहे.

सोलापूर : "नमामि चंद्रभागा' अभियानातील कामे कागदोपत्री निश्‍चित करण्यात आली असली, तरी दृश्‍य स्वरूपात दिसत नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांकडून त्याची अंमलबजावणी होत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर फारशी प्रगती झाली नसल्याचे चित्र आहे. 

राज्यातील तमाम विठ्ठलभक्तांच्या जिव्हाळ्याचा भाग असलेल्या चंद्रभागा नदीचे जलप्रदूषण रोखण्याचा प्रयत्न अद्यापही यशस्वी झालेला नाही. नदीप्रदूषणाची मुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. उजनी धरणातील जलप्रदूषण हा आणखी वेगळा व गंभीर मुद्दा आहे. नदी परिसर स्वच्छतेचा विषय पंढरपूर नगरपालिकेशी निगडित आहे. चंद्रभागेच्या पात्रात गावातील अनेक गटारे थेट जोडल्याचे आढळून येते. त्याबाबतही या योजनेतून काम अपेक्षित आहे. घाट परिसर व नदीच्या काठावर दुतर्फा वृक्षलागवडीचा मुद्दा वादात आहे.

महसूल विभागाने नदीकाठी वृक्षारोपण करण्याची जागा निश्‍चित करणे, त्याला वनविभागाची साथ मिळणे आणि काठावरील शेतकऱ्यांचे सहकार्य मिळणे या परस्परविरोधी गोष्टी असल्याचे ध्यानात येत आहे. सौंदर्यीकरणाबाबत अशीच स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र विकास परिषद, वसुंधरा विकास संस्था आणि समग्र नदी परिवारातर्फे उद्या, रविवारी (1 जुलै) पंढरपुरात परिषद होणार आहे. 

भीमा खोरे विकासाचा विचार हवा 

नमामि चंद्रभागा अभियान किंवा प्राधिकरणाच्या माध्यमातून पंढरपूर परिसर, घाट, चंद्रभागेचा काठ यांच्या विकासाचा विचार उपयोगाचा नाही. नदी जलप्रदूषण तर रोखायलाच हवे, मात्र एकूणच भीमा खोऱ्याचा विकास करण्याची दृष्टी ठेवायला हवी. खोऱ्याच्या वरच्या टप्प्यातून समुद्रात वाहून जाणारे पाणी तुटीच्या भागाकडे वळवायला हवे. दुष्काळ निवारणासाठी जलव्यवस्थापन करणे, हाही या "नमामि चंद्रभागा'चा अंगभूत भाग मानला पाहिजे. 

Web Title: Namami Apologize Chandrabhaga campaign