'नमामि चंद्रभागा' कागदावरच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

वाळूमाफियांचा चंद्रभागेच्या वाळवंटातून हैदोस; अहोरात्र वाळूचा उपसा सुरू
पंढरपूर - महाराष्ट्राचे वैभव असणारी आणि वारकरी संप्रदायाला प्रेरणा देणारी चंद्रभागा नदी निर्मळ, अविरत वाहण्यासाठी नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली; परंतु त्यानंतर सहा महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप यासंदर्भात कोणत्याही कामांना सुरवात झालेली नाही. दुसरीकडे वाळूमाफियांकडून चंद्रभागेच्या वाळवंटातून वाळूचा उपसा मात्र अहोरात्र सुरूच आहे.

चंद्रभागा नदी आणि वाळवंटाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन नमामि चंद्रभागा अभियान राबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला होता. त्याची दखल घेऊन फडणवीस यांनी नमामि चंद्रभागा अभियानातून नदीच्या उगमापासून म्हणजे भीमाशंकरपासून संगमापर्यंत कामे केली जातील.

त्यासाठी नमामि चंद्रभागा प्राधिकरण स्थापन करून समाज आणि संतांच्या सहकार्याने संपूर्ण ताकदीने हे सर्व काम या सरकारच्या काळात पूर्ण केले जाईल, असे 1 जून 2016 रोजी पंढरपूर येथे सांगितले होते. त्यानंतर किमान येथील चंद्रभागा नदी परिसर स्वच्छ राहील आणि वाळवंटातून अहोरात्र होणारा वाळूचा उपसा पूर्णपणे थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त झाली होती. हे अभियान राबवण्यासाठी 17 जुलै रोजी शासनाने नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची अधिकृत स्थापना केली. याविषयीच्या संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑगस्टमध्ये उद्‌घाटन करण्यात आले होते. अभियानाचा आराखडा तयार करण्यासाठी अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली.

या प्राधिकरणाच्या माध्यमातून चंद्रभागा प्रदूषणमुक्त करून तिच्या संवर्धनासाठी नदीपात्रातील पाणीपातळी कायम राहावी, यासाठी बंधारे बांधणे, नदीचा किमान पर्यावरणीय प्रवाह अबाधित ठेवणे, नदीकडेच्या भागातील नागरी वस्त्यांमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारणे, नदी घाटाचे सौंदर्यीकरण व वनीकरण करणे आदी अनेक कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने नमामि चंद्रभागा अभियान फक्त कागदावरच असल्याचे चित्र दिसत आहे.

सहा महिन्यांत बैठकीही नाही
प्राधिकरणामार्फत अभियानासंदर्भात दर तीन महिन्यांनी नियमित आढावा घेण्याचे ठरले होते. अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांची स्वतंत्र शक्ती प्रदत्त समितीही गठित करण्यात आली; परंतु गेल्या सहा महिन्यांत या समितीची साधी बैठकदेखील झालेली नाही.

pdr18p04
पंढरपूर : येथे चंद्रभागा वाळवंटात वाळू उपशामुळे जागोजागी पडलेले खड्डे.

Web Title: namami chandrabhaga river