Kishor Aware : किशोर आवारे हत्येप्रकरणात आमदार सुनील शेळके यांचं नाव; आईच्या तक्रारीने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sunil shelke

Kishor Aware : किशोर आवारे हत्येप्रकरणात आमदार सुनील शेळके यांचं नाव; आईच्या तक्रारीने खळबळ

पिंपरीः तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (वय ४८, ता. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांची शुक्रवारी (ता. १२) दुपारी पावनेदोनच्या सुमारास गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करून हत्त्या करण्यात आली. या प्रकरणी आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर व त्याचे तीन साथीदार यांच्या विरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आवारे यांच्या मातोश्री सुलोचना गंगाराम आवारे यांनी फिर्याद दिली आहे.

किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना गंगाराम आवारे (६९, स्वप्न नगरी, तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि. पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, किशोर आवारे यांचे राजकीय विरोधक असलेले सुनिल शेळके, सुधाकर शेळके,संदीप गराडे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच भांडणे होत होती. गेल्या सहा महिन्यापासून किशोर हे नेहमी मला आमदार सुनिल शेळके त्याचा भाऊ सुधाकर शेळके यांच्याकडून जिवाला धोका असल्याबाबत सांगत असत. तसेच माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर ते याच लोकांपासून होईल हे प्रत्यक्षपणे सांगितले होते, असं म्हटलं आहे.

एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके यांचं नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे. किशोर यांनी स्वतःचा वेगळा गट तयार करून सुनिल शेळके यांना गेल्या दोन वर्षापासून पूर्णपणे राजकीय विरोध केलेला आहे. तसेच सोशल मिडीयावरही ही याबाबत पोस्ट केली होती.

शुक्रवारी (ता.१२) किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत गेले असता दुपारी पावनेदोन वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेच्या खाली गेटच्या आत आवारामध्ये किशोर आवारे यांच्यावर सुनिल शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे यांनी कटकारस्थान रचून त्यांचे साथीदार श्याम निगडकर व इतर तीन अनोळखी हल्लेखोरांनी आपआपसात संगनमत करुन बंदुकीच्या गोळ्या झाडून व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने गंभीर वार करून जखमी करुन किशोर यांचा खून केला, असं तक्रारीत म्हटलं आहे.

असं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आमदार सुनील शेळके यांचं नाव पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील करीत आहेत.

टॅग्स :murdersunil shelke