शेतकऱ्यांना हमीभाव मिळायलाच हवा : नाम 

सौमित्र पोटे
शुक्रवार, 2 जून 2017

ई-सकाळशी बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले, 'या संपाबाबत नाना पाटेकर यांच्याशी विचार विनिमय करून आम्ही आमची भूमिका मांडतो आहे. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळायलाच हवा. त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसते. आपण शेतकर्यांना कर्ज देतो. पण त्यांची स्थिती लक्षात घेत नाही.

पुणे ; गुरूवारपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी संपाला नाम फाउंडेशनने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळायलाच हवा. राज्यात संप होणे ही एक प्रकारची प्रतिक्रिया आहे. 'नाम'चा या संपाला पाठिंबाच असून राज्य सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढला पाहिजे. अन्यथा अराजक माजेल, अशा शब्दात फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनाकपुरे यांनी 'नाम'ची भूमिका मांडली. 
'नाम' सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम करते आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा म्हणून 'नाम'ने पुणे, मुंबई येथे धान्याचे थेट बाजारही भरवले. या संस्थेने राज्यातील शेतकऱ्यांची आपली अशी फळी निर्माण केली आहे. या पार्श्‍वभूमीवर या संपाबाबतची त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपली भूमिका मांडताना ई-सकाळशी बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले, 'या संपाबाबत नाना पाटेकर यांच्याशी विचार विनिमय करून आम्ही आमची भूमिका मांडतो आहे. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळायलाच हवा. त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसते. आपण शेतकर्यांना कर्ज देतो. पण त्यांची स्थिती लक्षात घेत नाही. जूनमध्ये पाऊस येणार म्हणून तो मेमध्ये कर्ज घेतो. पेरणी करतो. पण पुढे पाऊस जातो आणि शेतीपूरक पाऊस जुलैमध्ये येतो. मग त्याला पुन्हा पेरणी करावी लागते. अशावेळी त्याने घेतलेले कर्ज पावसाच्या हुलकावणीत वाया गेलेले असते. कर्ज काढून वाढवलेले पिक घ्यायची वेळ येते तेव्हा शेतात हत्ती, गवा धूडगुस घालून जातो. अशावेळी हे कर्ज परत कसे करणार? आपल्या कर्जात या अनपेक्षित घटनांचा विचारच झालेला नसतो. संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून हा व्यवसाय आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळायला हवा. दोन वर्षांपूर्वी तूरीचा दर 13 हजार रुपये क्विंटल होता. आता तो 5 हजार रुपये आहे. यातून तूर पिकवलेले शेतकरी झोपले ना? प्रत्येक पिकाला एक हमीभाव हवा.' 
गुरुवारपासून सुरु असलेल्या संपाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी दूध, भाजीपाला रस्त्यावर टाकून निषेध नोंदवला जात आहे. या प्रकाराबद्दल अनासपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, 'हा संपही सरकारच्या ऍक्‍शनवरची रिऍक्‍शन आहे. ती काही ठिकाणी टोकाची असू शकते. त्यांची व्यक्त होण्याची ती पद्धत आहे. यावर राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढायला हवा. 
आपली भूमिका स्पष्ट करतानाच या ऐतिहासिक संपाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शेतकरी एकत्र आला आहे ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. 
 

Web Title: Nana patekar Makarand Anaspure Naam esakal news