नाणारवरून विधानसभेत राजदंडाची पळवापळवी 

बुधवार, 11 जुलै 2018

दोघांमधे झटापट सुरू असताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक देखील धावून गेले व त्यांना नितेश राणेंना खेचत राजदंडावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विधानसभेतील सुरक्षा रक्षकांनी राजदंड आपल्या ताब्यात ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न केला.

नागपूर : नाणार प्रकल्प रद्द झालाचं पाहीजे, या मागणीवरून शिवसेना आमदारांनी आज (बुधवार) विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला. चार वेळा कामकाज तहकूब केल्यानंतरही शिवसेना आक्रमक असल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील राजदंड पळवण्यासाठी शिवसेना आमदार राजन साळवी, प्रताप सरनाईक याची व काँग्रेस आमदार नितेश राणे यांची प्रचंड झटापट झाली. सुरूवातीला राजन साळवी यांनी अध्यक्षाच्या आसनासमोर जावून राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान नितेश राणे देखील धावले व राजदंड हिसकवण्याचा प्रयत्न केला.

दोघांमधे झटापट सुरू असताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक देखील धावून गेले व त्यांना नितेश राणेंना खेचत राजदंडावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विधानसभेतील सुरक्षा रक्षकांनी राजदंड आपल्या ताब्यात ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण या झटापटीमधे वयोवृध्द सुरक्षारक्षक खाली कोसळले. अखेर हा संघर्ष पाहून विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.

Web Title: Nanar project ShivSena MLA rucks in Vidhan Sabha