नांदेड-वाघाळासाठी आज मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई - नांदेड-वाघाळा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (ता. ११) मतदान होत असून, ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर केला जाणार आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कसोटी लागणार आहे. या महापालिकेवर चव्हाण यांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोराने प्रयत्न केले आहेत.

महापालिकेच्या एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण ८९१ उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यातील ३१३ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता ५७८ उमेदवार आहेत. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक २ मध्ये २६ उमेदवार आहेत. ११ ऑक्‍टोबर २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. १२ ऑक्‍टोबर २०१७ रोजी मतमोजणी होईल. 

एकूण २० पैकी १९ प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग ५ सदस्यांचा आहे. एकूण ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार असून, त्यांच्यासाठी ५५० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.२ वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी ७३४ मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.२ मध्ये मतदारांची एकूण संख्या २० हजार ३०७ इतकी आहे. त्यांच्यासाठी ३७ मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी ५५० मतदार असतील.

Web Title: Nanded-Waghala Municipal Corporation election