संपूर्ण तूर खरेदीपर्यंत नाफेडची केंद्रे सुरू राहणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 मार्च 2017

मुंबई - राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांची तूर विक्री होणे अजून बाकी असल्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील नाफेडची सर्व तूर खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, अशी मागणी पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेऊन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी कोणतेही तूर खरेदी केंद्र बंद करण्यात येणार नसल्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात नाफेडच्या वतीने 118 तूर खरेदी केंद्रे सुरू आहेत. त्यातील 58 तूर खरेदी केंद्र बंद करण्यासंदर्भात नाफेडकडून 21 मार्च रोजी मार्केटिंग फेडरेशनला कळविण्यात आले होते. यासंदर्भात पणनमंत्री देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना नाफेड तूर खरेदी केंद्र बंद करू नयेत, असा प्रस्ताव केंद्राला पाठवून विनंती केली. राज्यात चांगला पाऊस झाल्याने तुरीचे या वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शासनाने 5050 रुपये हमीभाव दिला आहे.

आतापर्यंत सर्वाधिक 28 लाख क्विंटल तूर खरेदी झाली आहे. 15 एप्रिलपर्यंत अजून जवळपास 10 लाख क्विंटल खरेदी होईल, असा अंदाज आहे. त्यासाठी राज्यात 317 तूर खरेदी केंद्रे सुरू आहेत. त्यात 118 तूर खरेदी केंद्रे ही नाफेडची आहेत. ही खरेदी केंद्रे शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी होईपर्यंत सुरू राहणार आहेत.

Web Title: naphed center open for tur purchasing