भारताला रविवारची सुटी देणारा मराठी माणूस...

विवेक मेतकर
शनिवार, 9 जून 2018

रविवारच्या सुटीचा इतिहास मोठा रंजक आहे. आपल्या देशात पूर्वी अशा सुट्या नव्हत्या. पण शनिवारी तेल आणू नये किंवा सोमवारी कटिंग करू नये असे मानले जायचे. या मान्यतेनुसार संबंधितांचा आठवडी सुटीचा दिवस ठरायचा. औद्योगिक क्रांतीनंतर नोकरी नावाचे प्रकरण आले आणि मग साप्ताहिक सुटीची गरज वाटू लागली.

अकोला : नर्सरीत जाणाऱ्या छोट्या चिमुकल्यांपासून तर ऑफिसमधील बाबू-साहेबांपर्यंत कुणालाही विचारा, तुमचा आवडता दिवस कोणता? उत्तर ठरलेलं आहे, रविवार. कारण रविवार म्हणजे सुट्टीचा, आरामाचा...एकूणच सहकुटुंब ‘एन्जॉय’ करण्याचा दिवस. आपल्या सगळ्यांना अतिशय प्रिय असलेली रविवारची सुट्टी १० जून रोजी १२८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. भारतीयांना रविवारची पहिली सुट्टी मिळाली होती ती १० जून १८९० रोजी. तीही कोण्या इंग्रजी साहेबांच्या मेहरबानीने नव्हे तर नारायण मेघाजी लोखंडे या मराठी माणसाने तब्बल सहा वर्षे केलेल्या संघर्षामुळे.

सुटीचा रंजक इतिहास -
रविवारच्या सुटीचा इतिहास मोठा रंजक आहे. आपल्या देशात पूर्वी अशा सुट्या नव्हत्या. पण शनिवारी तेल आणू नये किंवा सोमवारी कटिंग करू नये असे मानले जायचे. या मान्यतेनुसार संबंधितांचा आठवडी सुटीचा दिवस ठरायचा. औद्योगिक क्रांतीनंतर नोकरी नावाचे प्रकरण आले आणि मग साप्ताहिक सुटीची गरज वाटू लागली.

१८५४ मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली. १८७० पर्यंत नागपूर, कानपूर, मद्रास येथेही कापड गिरण्या सुरू झाल्या. तोकडे वेतन, अनिर्बंध कामाचे तास, सुटी आणि विश्रांतीचा अभाव अशी त्यावेळी स्थिती होती.

sunday

कामगारांना मिळाला हक्क
१८८१मध्ये भारतात फॅक्टरी अँक्ट लागू झाला. या कायद्याने बालकामगारांचे किमान वय सात आणि कामाचे तास नऊ ठरविले. आठवड्याच्या सुटीची तरतूद केली. मात्र महिला व प्रौढ कामगारांसाठी अशी तरतूद नव्हती. याविरोधात पहिला आवाज उठवला तो रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी. १८८४ मध्ये नेमलेल्या फॅक्टरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचे निवेदन दिले. त्यात आठवड्यात एक दिवस सुटी, सूर्योदय ते सूर्यास्त ही कामाची वेळ, दुपारी अर्धा तास विश्रांती अशा मागण्यांचा समावेश होता. पण, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. लोखंडे यांनी आंदोलन सुरूच ठेवले. २४ एप्रिल १८९० रोजी त्यांनी दहा हजार कामगारांची सभा घेतली. त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि १० जून १८९० रोजी ‘रविवार’ हा साप्ताहिक सुटीचा दिवस म्हणून जाहीर झाला. आज भारतात सर्व सरकारी कार्यालये तसेच बहुतांश खासगी कंपन्यांमध्ये रविवारी साप्ताहिक सुटी असते. अनेक कंपनी-संस्थांमध्ये ‘ऑफ’ अन्य दिवसही असतो. पण हक्क म्हणून मिळतो. सुटीचा हाच हक्क नारायण लोखंडे या मराठी माणसाने भारतीयांना मिळवून दिला.

‘हॉली डे’
भारतात तेव्हा ब्रिटिशांचे राज्य असल्याने ख्रिश्चनधर्मीय ब्रिटिशांनी भारतात रविवार हा दिवस साप्ताहिक सुटीचा जाहीर केला. चर्चमधील प्रार्थनांसाठी त्याचा उपयोग व्हायचा. मात्र तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये साप्ताहिक सुटीबाबत दोन मतप्रवाह होते. ख्रिश्चन धर्माप्रमाणे रविवारी साप्ताहिक सुटी द्यावी, असे एका गटाचे म्हणणे होते तर भारताचे बहुधर्मीय-बहुसांस्कृतिक स्वरूप लक्षात घ्यावे, अशी भूमिका दुसऱ्या गटाची होती. ब्रिटिश साम्राज्यापूर्वी मोगल राजवटीत शुक्रवारी साप्ताहिक सुटी राहायची. अनेक धर्मांमध्ये एखादा विशिष्ट दिवस पवित्र मानला जातो. त्याला इंग्रजीत ‘होली डे’ असे म्हटले जाते. या ‘होली डे’वरूनच पुढे ‘हॉली डे’ हा शब्द रुढ झाल्याचे मानले जाते.

Web Title: narayan lokhande gives sunday holiday to india