नारायण राणे म्हणतात, ‘मी जात नाहीय, मला भाजपमध्ये बोलवलंय’

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 September 2019

भाजपात जाणार हे पक्के आहे. मी भाजपमध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून, त्यांनी मला बोलावलं आहे,’ असा खुलासा माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज पुण्यात केला.

पुणे : ‘भाजपात जाणार हे पक्के आहे. मी भाजपमध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून, त्यांनी मला बोलावलं आहे,’ असा खुलासा माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज पुण्यात केला. सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये "युवर्स टूली नारायण राणे' कार्यक्रमात ते बोलत होते. राणे यांनी नुकत्याच लिहिलेल्या "झंझावात' या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निमित्ताने पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

शिवसेनेचा वाघ नव्हे शेळ्या-मेंढ्या

दरम्यान, नारायण राणे यांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येते, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे, त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, त्याच्या शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत.’ 

काँग्रेस नेत्यांवर गरजले राणे 

शिवसेनेने माझ्या भाजपप्रवेशाला आडकाठी केल्याचे सांगत राणे म्हणाले, ‘शिवसेनेला मी नको असल्याने त्यांनी भाजपप्रवेशात आडकाठी आणली. त्यांना माझी भीती वाटते. मात्र, मी भाजपात जाणार हे पक्के आहे. मी भाजपमध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून, त्यांनी मला बोलावलं आहे.’

Vidhan Sabha 2019 : शहा-ठाकरे भेट रद्द? युती तुटण्याचे संकेत

याच मुलाखतीमध्ये राणे यांनी काँग्रेसवरही टीका केली. राणे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसचे नेतेच कारणीभूत आहेत. पक्ष तळागाळापर्यंत पोचला असतानाही ते लोकांपर्यंत गेले नाहीत. त्यात अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत कमी आहे. पक्षासाठी काही करावे, अशी नेत्यांची नीतिमत्ता नाही.’

निवडणूक लागली तरी प्रवेश नाही

नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पण, विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली तरी, राणे यांचा भाजपप्रवेश लांबलेलाच आहे. मुळात राणेंच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे युती तुटली तरच राणे भाजपमध्ये येतील किंवा राणे भाजपमध्ये आले तर, युती तुटेल, अशी परिस्थिती आहे.

पुणे : मोदींचे वर्गमित्र हरीभाई शहा यांचा आठव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आहेत. पण, त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी होणारी संभाव्य बैठक रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. युती तुटण्याचे हे संकेत असून, कदाचित त्यानंतर राणेंचा भाजपप्रवेश होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane says I am not going I have been invited to BJP