ॲड. पुनाळेकर,भावे यांना अटक

ॲड. पुनाळेकर,भावे यांना अटक

मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन बाँबस्फोटातील संशयित विक्रम भावे यांना काल अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान आरोपींनी वापरलेल्या शस्त्रांची विल्हेवाट लावण्यासाठी पुनाळेकर आणि भावे यांनी त्यांना मार्गदर्शन केल्याचा आरोप ‘सीबीआय’ने केला आहे.

ॲड. पुनाळेकर आणि भावे या दोघांनाही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून, आरोपींविरोधात आमच्याकडे सक्षम पुरावे आहेत. असल्याचे ‘सीबीआय’च्या प्रवक्‍त्याने सांगितले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या ठिकाणाची भावे याने रेकी केली होती. तसेच दाभोलकर यांची ओळख पटविण्याचे कामही त्याने केल्याचा आरोप आहे. हत्येतील शस्त्रांची विल्हेवाट लावण्यात ॲड. पुनाळेकर आणि भावे यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय ‘सीबीआय’ला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र वसईतील खाडीत फेकण्यात आल्याचे चौकशीदरम्यान आरोपींनीच सांगितले होते. 

अंधश्रद्धेविरोधात लढा देणारे डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पाच वर्षे या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नव्हती. ‘सीबीआय’कडे या गुन्ह्याचा तपास सुपूर्त करण्यात आल्यानंतर कर्नाटक पोलिसांना या प्रकरणात तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळाली होती, त्यानंतर सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक झाली होती. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले होते. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. ‘एटीएस’ने औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले होते. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करून  ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आले.

कोण आहेत? पुनाळेकर, भावे
पुनाळेकर हे मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात. तसेच ते डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपींचे वकीलही होते. गौरी लंकेश हत्येप्रकरणी चौकशी दरम्यान ॲड. पुनाळेकर यांचेही नाव पुढे आले होते. पुनाळेकर हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव आहेत, तर भावे या परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. ठाणे आणि पनवेलमध्ये ४ जून २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटप्रकरणी विक्रम भावेला दोषी ठरवण्यात आले होते. त्याला १० वर्षांची शिक्षा झाली होती. ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पनवेलमधील एका थिएटरमध्ये हे स्फोट झाले होते. वाशीतील विष्णुदास भावे सभागृहासमोर जिवंत बाँब सापडला होता. त्या वेळी ‘आम्ही पाचपुते’ हे नाटक सुरू होते. या नाटकात हिंदू देवीदेवतांचे विडंबन केल्याच्या वादातून हे बाँबस्फोट करण्यात आले होते. या स्फोटांत सात जण जखमी झाले होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना केलेली अटक निषेधार्ह आहे. केंद्रात हिंदुत्ववादी सरकार सत्तारूढ असताना या दोघांना झालेल्या अटकेमागे षड्‌यंत्र आहे. सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे ‘सीबीआय’ झुकली आहे. 
चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com