मोदी-शहांचा सत्तेचा दर्प जनतेने उतरवला - पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मुंबई - भाजपचा तीन प्रमुख राज्यांत जनतेने केलेला पराभव हा मोदी - शहा यांच्या राजकीय धोरणांना दिलेली चपराक असून, जनतेने सत्तेचा दर्प उतरवल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. कॉंग्रेसला जनतेने दिलेला कौल हा केवळ चार राज्यांचा प्रश्न नाही, तर यापुढे लोकांना जिथे जिथे संधी मिळेल त्या सर्व ठिकाणी आणि ज्या वेळी निवडणुका होतील, त्या प्रत्येक वेळी देशातील चित्र बदललेले दिसेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चार राज्यांचा लागलेला निकाल पाहता लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. या राज्यात जे निकाल आले आहेत, त्याबद्दल भाजप व्यतिरिक्त इतर सर्व पक्षांना समाधान आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी कॉंग्रेस हा पर्याय महत्त्वाचा आहे, याची जाणीव लोकांनी करून दिली आहे, असे पवार यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी परिवारावर केलेल्या आक्रमक टीकेबाबत पवार यांनी नाराजी व्यक्‍त केली.

राहुल गांधीचे नेतृत्व जनतेने स्वीकारले
कॉंग्रेसने नेतृत्व नवीन पिढीकडे सोपवले असून, ते लोकांनी मान्य केले आहे, अशा शब्दांत पवार यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. आता देशातील सर्वच पक्षांनी मतभेद विसरून एकत्र यायला हवे. समाजवादी पक्ष व बसप यांनीही महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.

Web Title: Narendra Modi Amit Shaha Power Sharad Pawar Politics