‘मोदी मेट्रो’ला घोषणांचे डबे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नवी मुंबई / पुणे - आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागलेल्या सत्ताधारी भाजपने आज आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक नगरी पुण्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो सेवेचे भूमिपूजन करतानाच एक पाऊल पुढे टाकले.

या दोन्ही ठिकाणांवर आश्‍वासनांचे डबे घेऊन ‘मोदी मेट्रो’ अक्षरश: सुसाट धावली. विरोधकांना उपरोधिक टोले लगावत मोदींनी सरकारच्या कामांचा लेखाजोखा तर मांडलाच, पण त्याचबरोबर ‘कॉमन मॅन’ला भविष्याची स्वप्नेही दाखविली. तब्बल ४१ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत प्रकल्पांचा शुभारंभ करत मोदींनी आज जणू आगामी निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

नवी मुंबई / पुणे - आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागलेल्या सत्ताधारी भाजपने आज आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक नगरी पुण्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो सेवेचे भूमिपूजन करतानाच एक पाऊल पुढे टाकले.

या दोन्ही ठिकाणांवर आश्‍वासनांचे डबे घेऊन ‘मोदी मेट्रो’ अक्षरश: सुसाट धावली. विरोधकांना उपरोधिक टोले लगावत मोदींनी सरकारच्या कामांचा लेखाजोखा तर मांडलाच, पण त्याचबरोबर ‘कॉमन मॅन’ला भविष्याची स्वप्नेही दाखविली. तब्बल ४१ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत प्रकल्पांचा शुभारंभ करत मोदींनी आज जणू आगामी निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

पंतप्रधानांच्या हस्ते कल्याण येथे दोन मेट्रो कॉरिडॉरचे भूमिपूजन करण्यात आले, यात ठाणे- भिवंडी-कल्याण मेट्रो आणि दहिसर - मीरा भाईंदर मेट्रो यांचा समावेश होता. या वेळी सिडकोच्या नव्या गृहनिर्माण प्रकल्पाचेही उद्‌घाटन करण्यात आले. पुण्यामध्येही हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामाचा नारळही पंतप्रधानांच्या हस्ते फोडण्यात आला.

मुंबईत मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, ‘‘मुंबईत २०२२ ते २४ या दोन वर्षांत मुंबईकरांसाठी पावणेतीनशे किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्यात येईल. काँग्रेसच्या काळामध्ये आठ वर्षांत केवळ अकरा किलोमीटरपर्यंतचेच काम झाले. २००६ मध्ये मेट्रोचे काम सुरू झाले होते, पण पुढे कुठे अडले? आता आम्ही ‘सिडको’च्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून ठाण्यातील ९० हजार गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना हक्काचे घर देणार आहोत. या घरांचे काम सुरू झाले असून, पुढील तीन वर्षांत ही घरे तयार होतील.’’ या कार्यक्रमास राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यमंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.

आमचे सरकार बेघरांसाठी चांगल्या सोसायट्यांची निर्मिती करत आहे, पण ही काँग्रेसच्या काळात चर्चेत होती, तशी ‘आदर्श सोसायटी’ नसेल.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान (मुंबईतील कार्यक्रमात बोलताना)

पुणे मेट्रोमुळे हिंजवडीसारख्या आयटी सेंटरला याचा फायदा होईल. आठ हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक गुंतवणूक असलेल्या या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पामुळे लोकांचे जीवन अधिक सुसह्य होणार आहे. पुढील वर्षाअखेरीस पुण्यात बारा किलोमीटरपर्यंत मेट्रो धावेल.

पुण्यातील कार्यक्रमात बोलताना
सामान्य माणूस हे आपल्या कामाचे, चिंतनाचे क्षेत्र असून, आज हवाई चप्पल घालणारे विमानातून प्रवास करतात, रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांपेक्षा विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आर. के. लक्ष्मण यांनी व्यंग्यावर बोट तर ठेवले, पण त्यातून शत्रू निर्माण केले नाहीत. नाकाची तीव्रता त्यांनी लक्षात आणून दिली. स्वत:च्या भूमिकेतून कॉमन मॅन चितारला. त्यांचा कॉमन मॅन हा कोणत्याही विशिष्ट प्रांतातल्या, दाक्षिणात्य नागरिकासारखा नाही, तर भारतीयासारखा दिसतो हे विशेष. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान (पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना)

दिवसभरात
रेरा लागू केल्याबद्दल मोदींकडून महाराष्ट्राचे कौतुक
मुंबईतील कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
मुंबई, पुण्यात मोदींच्या भाषणाची सुरवात मराठीतून
ठाण्यातील दोन मेट्रो प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
नागपूर, नाशिक मेट्रोचाही नारळ फोडण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प
मोदींच्या कार्यक्रमामुळे मुंबईत स्मशानभूमीला टाळे, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर अत्तरांचे फवारे

‘जीएसटी’ सुटसुटीत
वस्तू आणि सेवाकराची रचना (जीएसटी) अधिकाधिक सुटसुटीत करण्याचे सूतोवाच करतानाच मोदींनी आपले सरकार ९९ टक्के वस्तू अठरा टक्‍क्‍यांपेक्षाही कमी कर श्रेणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. जीएसटीची अंमलबजावणी होण्यापूर्वी नोंदणीकृत आस्थापने केवळ ६५ लाख एवढीच होती, पण नवी करप्रणाली आल्यानंतर त्यांची संख्या ५५ लाखांनी वाढल्याचे ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. जीएसटीचा २८ टक्के एवढा स्लॅब मोजक्‍याच वस्तूंपुरता मर्यादित ठेवण्याचेही त्यांनी सूतोवाच केले.

पंतप्रधान म्हणाले...
 पैसे बुडवून पळालेल्यांना देशात आणू
 कर्जबुडवेगिरी रोखण्यासाठी दिवाळखोरी संहितेत बदल
 कंपन्यांनी पावणेदोन लाख कोटींचे कर्ज फेडले
 देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरच्या दिशेने
 ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये देश ७७ व्या स्थानी
 प्रवासी वाहतुकीसाठी एक हजार नवी विमाने
 आजमितीस देशातील ९७ टक्के परिसर स्वच्छ
 प्रत्येक कुटुंब बॅंकिंगशी जोडले आहे
 दीड वर्षांत ५५ लाख उद्योजकांची नोंदणी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi Pune Metro Announcing