काश्‍मीरप्रश्‍नी पक्षभेद विसरून मोदींना साथ देऊ - पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सोलापूर - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्‍मीरमध्ये दोन वर्षांपूर्वी दिवाळी साजरी केली, त्यातून काश्‍मीरच्या जनतेला विश्‍वास मिळाला; परंतु त्यांचा प्रश्‍न सुटला नाही. त्यातून तेथील जनतेला नैराश्‍य आले. आज काश्‍मीरच्या तरुणांनी हातात दगड घेतला, भारतातून हा भाग फुटून निघणार असल्याचे चित्र जागतिक पातळीवर दाखविले जात आहे. काश्‍मीरचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पक्षभेद सोडून देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देऊन हा प्रश्‍न सोडवू,'' असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

विधिमंडळ व संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्याच्यावतीने पवार यांचा नागरी सत्कार झाला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभेचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते पवारांचा सत्कार झाला. या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार ऍड. शरद बनसोडे, आमदार दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, आमदार भारत भालके, आमदार प्रणिती शिंदे, आमदार रामहरी रूपनवर, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार हनुमंत डोळस आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'मनमोहनसिंग यांच्या काळात काश्‍मीरमधील हा तरुण शांत होता. हे तरुण आताही शांत होतील, त्यासाठी राजकीय मतभेद विसरून हा प्रश्‍न सोडविण्याची आवश्‍यकता आहे, तरच हा देश टिकेल आणि उभा राहील.''

'सोलापुरात लिंगायत, साळी, मुस्लिम, दलित, भटक्‍या विमुक्त जाती असा समाज असताना देखील शहराचे सामाजिक जीवन चांगले आहे. महाराष्ट्रात सामाजिक जीवन चांगले असलेले सोलापूर हे एकमेव शहर आहे. किल्लारीला भूकंप झाल्यानंतर सोलापूर शहराने भूकंपग्रस्तांना अन्न व वस्त्र दिले. संकटकाळात मदत करण्याचा आदर्श सोलापूरने घालून दिला आहे,'' असेही पवार म्हणाले.

Web Title: narendra modi support by sharad pawar for kashmir issue