
Ajit Pawar : "राष्ट्रवादीनेच रचला अजितदादांच्या बदनामीचा कट"
जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आम्हाला फोन करून अजित पवार यांचा पुतळा जाळून टाकण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर अजित पवार यांच्या पुतळ्याला जोडे मारा असंही आम्हाला फोनवरून सांगण्यात आलं होतं. राष्ट्रवादीनेच अजितदादांच्या बदनामीचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.
म्हस्के यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे या आरोपांवर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी गुंडांवर बोलूच नये. त्यांच्यासोबत फक्त तेच लोक फिरतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलून संजय राऊत मातोश्रीवर आपलं वट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.
निवडणुकीनंतर पुण्यात ठाकरे गटात भूकंप होणार आहे. ठाकरे गटातील सर्व नेते शिवसेनेत येणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावाही म्हसके यांनी यावेळी केला आहे.
तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना(शिंदेगट) विरुद्ध ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागण्याचं काम सातत्याने सुरु आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या या आरोपवर राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.